Breaking
Updated: मार्च 18, 2026
केज पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न
केज – सण – उत्सव हे डीजेमुक्त साजरे करावेत. सार्वजनिक ठिकाणी साजरे होत असलेल्या सण उत्सवात कोणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करील. त्याची गय केली जाणार नाही. असा इशारा केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी दिला.
केज येथील पोलीस ठाण्यात मंगळवारी गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी, हनुमान जन्मोत्सव या सण – उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे हे बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा डॉ. सीता बनसोड होत्या. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते हारून इनामदार, फौजदार लक्ष्मण कीर्तने यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना पोलीस निरीक्षक उनवणे म्हणाले की, लाऊडस्पीकर हे रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत वाजवता येणार नाही. सोशल मीडियावर पडणाऱ्या वादग्रस्त पोस्टला कोणी ही खतपाणी घालण्याचा प्रयत्न करू नये. अफवांवर विश्वास न ठेवता बळी पडू नका. उलट समाज बांधवांना जागृत करा. मिरवणुकीत शिस्त ठेवावी. शहरात बायपास, रिंगरोड नसून पर्यायी रस्ता नसल्याने मिरवणुकामुळे रस्ते हे अनेक तास बंद राहिल्याने प्रवासी व अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणून रस्त्याची एक बाजू मोकळी ठेवावी. इतरांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी नगराध्यक्षा डॉ. सीता बनसोड यांनी शहरातील नागरिक चांगला सामाजिक सलोखा जपत आहेत. सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात आमचा सहभाग असून सामाजिक बांधिलकी जपत आहोत. समतेचे ऐक्य टिकविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. इफ्तार पार्टीत सर्व जाती – धर्माचे लोक सहभागी होतात. झेंड्याची उंची वाढविण्याऐवजी विचारांची उंची वाढवावी.
सूत्रसंचालन व आभार फौजदार सुकुमार बनसोडे यांनी मानले. बैठकीला विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मौलाना, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.