Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

बीड जिल्हयामध्ये इयत्ता 10 वी व इ.12 वी परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान राबवावे -जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

Updated: फेब्रुवारी 4, 2026

By Vivek Sindhu

बीड जिल्हयामध्ये इयत्ता 10 वी व इ.12 वी परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान राबवावे

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

                                                                 –

बीड – दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, यांच्या अध्यक्षतेखाली दि.03 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आली. या बैठकीसाठी सर्व समिती सदस्य उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीव्दारे तहसिलदार, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत  जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गखोलीत CCTV कैमेरे बसवून ते कार्यान्वयीत करावेत, संवेदनशील परीक्षा केंद्रावर आवाजाचे रेकॉडींग होणारे CCTV कैमेरे बसवावेत, त्याची तपासणी तहसिलदार, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी पुढील दोन दिवसात करावी व त्याचा अहवाल सादर करावा, तसेच CCTV कैमे-यांचे अॅक्सेस जिल्हास्तरावर कंट्रोल रुम स्थापन करून तेथे घेण्यात यावेत, संवेदनशील परीक्षा केंद्रावरील आणि ज्या परीक्षा केंद्रातील वर्ग खोलीमध्ये CCTV कॅमेरे नसतील, तेथील केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित इतर कर्मचारी यांची अदलाबदल करावी, परीक्षाकेंद्रावर नियुक्त कर्मचा-या व्यतीरिक्त इतर कर्मचारी तसेच व्यक्तीना प्रवेश देऊ नये, इतर कर्मचारी परीक्षा केंद्रावर आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, परीक्षा केंद्रावर अनुदानित, अंशतः अनुदानित व जिल्हा परिषदेचे शिक्षक व इतर कर्मचारी नेमावेत, परीक्षा केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांसाठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात यावे, तालुकास्तरावरुन महत्वाच्या पेपरला वर्ग 1 च्या अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांना भेटी द्याव्यात.बीड जिल्हयामध्ये कॉपीमुक्त अभियान राबवून जिल्हा कॉपीमुक्त होण्याच्या दृष्टीने संबधित यंत्रणेने प्रयत्न करावेत, तसेच संवेदनशील परीक्षा केंद्रावर जास्तीत जास्त लक्ष ठेवून परिक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संबधित अधिकारी. कर्मचा-यानी लक्ष द्यावे असेही श्री. जॉन्सन या प्रसंगी म्हणाले.

     या VC बैठकीस संबधित अधिकारी उपस्थित होते.

         बीड जिल्हयामध्ये मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) फेब्रुवारी मार्च-2026 आयोजित केल्या आहेत. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दि.10फेब्रुवारी ते दि.18 मार्च 2026 आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दि.20 फेब्रुवारी ते दि.18 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.

         फेब्रुवारी/मार्च-2026 चे सुयोग्य प्रकारे संचालन व्हावे, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासन मुख्य सचिव यांनी दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी दूरचित्र प्रणालीव्दारे  जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच परीक्षेशी संबंधित अधिका-यांची बैठक घेवून सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये जिल्हा स्तरावर दक्षता समितीची बैठकः आयोजीत करून प्रत्येक परीक्षा केंद्रावर CCTV कैमेरे बर्सावणे, संवेदनशील परीक्षा केंद्रावरील केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व इतर कर्मचारी यांची अदलाबदल करणे, बैठे पथक व भरारी पथक नियुक्त करणे याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.

        जिल्हा स्तरावर दक्षता समिती गठीत करण्यात आलेली आहे.

         जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन अध्यक्ष, पोलीस अधिक्षक नवीनीत कॉवत सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, जितिन रहेमान सदस्य, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण सदस्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सदस्य, प्राथमिक शिक्षणाधिकारी सदस्य योजना शिक्षणाधिकारी सदस्य, माध्यमिक शिक्षणाधिकारी सदस्य सचिव आहेत.

          मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी दि.27 जानेवारी 2026 रोजी दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. सर्व गटविकास अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामस्तरावर कॉपीमुक्त अभियानाची जनजागृती करावी तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळामध्ये मुख्याध्यापक व पालक यांना परीक्षेसंबंधित कॉपीमुक्त अभियानाची माहिती दयावी. आकाशवाणी व इतर प्रसार माध्यमांमध्ये कॉपीमुक्त अभियानाची प्रसिध्दी देण्यात यावी भरारी पथकांनी इंग्रजी, गणित व विज्ञान इत्यादी महत्वाच्या विषयांच्या पेपरच्या दिवशी संवेदनशील केंद्रांना भेटी द्याव्यात. परीक्षेचे चित्रीकरण ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करावे. पोलीस विभागा मार्फत सर्व परिरक्षक कार्यालय व परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन देण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिलेल्या होत्या.

      परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे, तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परीसरात प्रतिबंधात्मक उपायोजना लागू करण्यात येणार असून परीक्षा केंद्रावर गैर प्रकार घडल्यास गैरप्रकारांना प्रोत्साहीत करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.

          जिल्हा दक्षता समितीने इ.10 व 12 वी च्या परीक्षा शांततेत व तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी व विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता वाढ होण्याच्या दृष्टीने जिल्हाभर कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबतच्या उपाययोजना केलेल्या असून मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी कॉपीमुक्त अभियान महत्वाची भूमिका असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.


Categories

Recent Posts