Breaking

वाढदिवसाला बोलावले नाही म्हणून नैराश्य; मित्रांशी वाद अन् एकटेपणाच्या भावनेतून अंबाजोगाईतील तरुणाची आत्महत्या

Updated: एप्रिल 8, 2026

By Vivek Sindhu

मित्रांशी वाद अन् एकटेपणाच्या भावनेतून अंबाजोगाईतील तरुणाची आत्महत्या

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: तालुक्यातील कुंबेफळ येथे एका २४ वर्षीय तरुणाने मित्रांसोबत झालेल्या वादानंतर आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला न बोलावल्यामुळे आलेल्या नैराश्यातून विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. महेश उद्धव भणगे असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, मंगळवारी दुपारी त्याने राहत्या घरी हे टोकाचे पाऊल उचलले. नेहमी मित्रांच्या सुख-दुःखात आणि कार्यक्रमांच्या नियोजनात सहभागी होणाऱ्या महेशला एका जवळच्या मित्राच्या वाढदिवसाला डावलण्यात आल्याने तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होता.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महेशने मंगळवारी दुपारी आपल्या राहत्या घराच्या छतावर पाणी पिण्याच्या तांब्यात विषारी द्रव्य मिसळून प्राशन केले. दुपारी तो एकटाच छतावर झोपायला गेला होता, मात्र बराच वेळ झाला तरी तो खाली न आल्याने रात्री ८ वाजेच्या सुमारास कुटुंबीय त्याला पाहण्यासाठी वर गेले. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आत्महत्येपूर्वी महेशने आपल्या मोबाईलवर “माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो” असे हृदयद्रावक स्टेटस ठेवले होते. गेल्या सोमवारी ६ एप्रिल रोजी त्याच्या एका मित्राचा वाढदिवस होता. नेहमी पुढाकार घेणाऱ्या महेशला यावेळेस मित्रांनी बोलावले नाही आणि त्याला सोडूनच सेलिब्रेशन केले. या घटनेमुळे तो स्वतःला सावरू शकला नाही. विशेष म्हणजे, महेशच्या जिद्दीसाठी त्याच्या वडिलांनी आपली शेती विकून त्याला अंबाजोगाई शहरात कपड्याचे दुकान टाकून दिले होते. ऐन उमेदीच्या वयात केवळ एका क्षुल्लक वादातून महेशने टोकाचे पाऊल उचलल्याने कुंबेफळ गावात हळहळ व्यक्त होत आहे. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.


Categories

Recent Posts