Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईत नगराध्यक्ष पदासाठी आठ उमेदवारांमध्ये थेट लढत

Updated: नोव्हेंबर 21, 2025

By Vivek Sindhu

images 35

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

नगराध्यक्ष पदाच्या ७, तर नगरसेवक पदासाठीच्या ३६ उमेदवारांची निवडणुकीतून माघार

अंबाजोगाई : नगर परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत संपताच अंबाजोगाई शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता आठ उमेदवारांमध्येच प्रत्यक्ष सामना ठरणार आहे. नगरसेवक पदासाठी ३६ उमेदवारांनी माघार घेतली असून १५ प्रभागांमधील एकूण १०८ उमेदवारांमध्ये स्पर्धा रंगणार आहे.

नगराध्यक्ष पदासाठी एकूण २२ नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. यापैकी ७ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर लोकविकास महाआघाडीचे राजकिशोर मोदी, जनविकास आघाडीचे काकाजी, कॉंग्रेसचे असिफोद्दीन खतीब, शिवसेना (शिंदे गट) चे गजानन मुडेगावकर, अपक्ष कृष्णा फुलझळके, खतीब वाजेद मोहियोद्दीन आणि सय्यद अकबर खाजामिया हे आठ उमेदवार रिंगणात कायम आहेत. शहरातील प्रमुख राजकीय प्रवाह लक्षात घेता मुख्य लढत मोदी आणि काकाजी यांच्यातच होणार असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळाचे निरीक्षण आहे.

नगरसेवक पदासाठी १५ प्रभागांमधून १८९ नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. त्यातील ३६ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता १०८ उमेदवारांसमोर निवडणुकीची लढत उभी राहिली आहे. अनेक प्रभागांमध्ये बहुकोनी लढती होत असून स्थानिक पातळीवर गणिते बदलण्याची शक्यता राजकीय चर्चेत अधोरेखित होत आहे.

शोभाताई लोमटे यांची धक्का देणारी माघार
शुक्रवारी झालेली सर्वात उल्लेखनीय घडामोड म्हणजे शोभाताई लोमटे यांनी दिलेली माघार. मागील निवडणुकीत त्यांनी भाजपकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती. यंदाही त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. शहरातील आगामी मतदान समीकरणांवर त्याचा काय परिणाम होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांची संख्या कमी झाल्यानंतर लढती अधिक स्पष्ट आणि थेट स्वरूपात आल्या आहेत. महाआघाडी आणि जनविकास आघाडी यांच्यातील थेट लढत प्रतिष्ठेची ठरली आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसा प्रचाराचा जोर, रणनीती, आघाड्यांचे समीकरण आणि पक्षनिष्ठतेची कसोटी अधिक तीव्र होत जाण्याचे चित्र दिसत आहे.


Categories

Recent Posts