Breaking

अंबाजोगाईच्या उपनगराध्यक्षपदी दिनेश भराडिया यांची बिनविरोध निवड

Updated: जानेवारी 15, 2026

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2026 01 15 at 5.23.50 PM

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

स्वीकृत नगरसेवकपदी राजकिशोर मोदी, बबनराव लोमटे, संजय गंभिरे बिनविरोध

अंबाजोगाई: अंबाजोगाई नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी लोकविकास महाआघाडीचे दिनेश भराडिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्यासोबतच स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजकिशोर मोदी, बबनराव लोमटे आणि संजय गंभीरे यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. गुरुवारी (दि.१५) नगरपालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

उपनगराध्यक्षपदी निवड झालेले दिनेश भराडिया हे प्रभाग क्र. ९ मधून नगरसेवक असून ते सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. प्रभागातील मतदारांशी असलेला दांडगा जनसंपर्क आणि लोकांच्या कामासाठी सदैव तत्पर राहण्याची त्यांची वृत्ती यामुळे त्यांनी राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रभाग पुनर्रचनेमुळे त्यांच्या हक्काचा भाग दुसऱ्या प्रभागात गेला असतानाही त्यांनी विजय मिळवला. त्यांच्या या अनुभवाचा आणि प्रशासकीय कामावरील पकडीचा विचार करूनच राजकिशोर मोदी यांनी त्यांचे नाव उपनगराध्यक्ष पदासाठी पुढे केले.

अंबाजोगाई नगर परिषदेत एकूण ३१ नगरसेवक असून, राजकिशोर मोदी यांच्या लोकविकास महाआघाडीकडे २० तर नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या शहर परिवर्तन जनविकास आघाडीकडे ११ नगरसेवक आहेत. उपनगराध्यक्ष पदासाठी शहरात मोठ्या राजकीय चढाओढीची आणि घोडेबाजाराची चर्चा रंगली होती. मात्र, नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी राजकीय प्रगल्भतेचा परिचय देत लोकशाही मूल्यांचा सन्मान केला. आपल्याकडे संख्याबळ कमी असल्याचे मान्य करत त्यांनी उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली आणि संभाव्य गैरप्रकारांना चाप बसला.

स्वीकृत नगरसेवक पदासाठी संख्याबळाच्या आधारे लोकविकास महाआघाडीला दोन आणि शहर परिवर्तन जनविकास आघाडीला एक जागा मिळाली. त्यानुसार लोकविकास महाआघाडीकडून राजकिशोर मोदी आणि बबनराव लोमटे तर शहर परिवर्तन जनविकास आघाडीकडून संजय गंभीरे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. या तिन्ही जागांच्या निवडीवर बिनविरोध शिक्कामोर्तब झाले. या प्रक्रियेत शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे गटनेते म्हणून स्वतः नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी, तर लोकविकास महाआघाडीचे गटनेते म्हणून सय्यद ताहेर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

गुरुवारी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित पहिल्या सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. या बैठकीचे पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी काम पाहिले, तर मुख्याधिकारी प्रियांका टोंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडीनंतर नगराध्यक्ष मुंदडा आणि मुख्याधिकारी टोंगे यांनी नवनियुक्त उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.


Categories

Recent Posts