राजकीय, शासकीय, खाजगी कार्यक्रमाला सेवा न देण्याचा निर्णय
अंबाजोगाई : पोलिस प्रशासनाने डीजेवर घातलेल्या बंदीच्या आदेशाचा निषेध करत अंबाजोगाई साऊंड लाईट मंडप व जनरेटर असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतली आहे. असोसिएशनच्या आज झालेल्या बैठकीत कोणत्याही राजकीय, शासकीय किंवा खासगी कार्यक्रमांना साऊंड, लाईट, जनरेटर, फोकस, मंडप, वायर, डेकोरेशनसह कोणतेही साहित्य पुरविणार नाही, असा ठराव करण्यात आला.
असोसिएशनने स्पष्ट इशारा दिला की, जर कोणत्याही व्यावसायिकाने साहित्य पुरविलेच तर त्यावर असोसिएशनकडून कारवाई करण्यात येईल. इतकेच नव्हे तर असे साहित्य थेट जप्त करण्यात येईल. याचा पहिला प्रयोगही आज करण्यात आला. शहरातील एका दवाखान्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी लावण्यात आलेले साऊंड व मंडप साहित्य असोसिएशनने जप्त करून आणले.
असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “आम्ही स्वच्छ, मर्यादित वाजणारा साऊंड वापरून व्यवसाय करतो. मात्र पोलिस प्रशासनाने कोणतीही शिस्तबद्ध तडजोड न करता थेट बंदी घातल्याने आम्हाला हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “डीजेचा वापर पूर्णतः बंद असला तरी आमचा व्यवसाय साऊंड, लाईट, मंडप यावर अवलंबून आहे. प्रशासनाकडून बंदी कायम राहिली तर अनेक कुटुंबे उपासमारीला सामोरे जातील.”
अंबाजोगाई साऊंड-लाईट मंडप व जनरेटर असोसिएशनच्या या निर्णयामुळे शहरासह तालुक्यातील राजकीय, शासकीय व खासगी कार्यक्रमांवर परिणाम होणार आहे. पुढील काही दिवसांत विवाह सोहळे, धार्मिक कार्यक्रम, उद्घाटने, राजकीय व शासकीय कार्यक्रमांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.