Breaking
Updated: डिसेंबर 1, 2025
धोत्रा येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – धोत्रा (ता. केज) येथे पिकांच्या नुकसानीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा ? बँकेचे कर्ज कसे फेडायचे ? या विचाराने चिंताग्रस्त बनलेल्या एका ३६ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी घडली.
केज तालुक्यातील धोत्रा येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष उर्फ बापू शाहूराव दोडके (वय ३६) यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून पीक कर्ज घेतले होते. यंदा अतिवृष्टी व सततच्या पावसाने खरीप हंगामातील पिके हातातून गेल्याने संतोष दोडके हे हताश झाले होते. शेतीत खर्च करून ही उत्पन्न पदरात पडले नाही. आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा ? महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडायाचे ? या विचाराने चिंताग्रस्त बनलेल्या संतोष दोडके यांनी टोकाची भूमिका घेऊन २७ नोव्हेंबर रोजी विषारी औषध प्राशन केले. त्यांना तातडीने बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना अखेर २९ नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते प्रेमळ, मनमिळावू व शांत स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन लहान मुली असा परिवार आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.