पावसामुळे मिळाला दिलासा, 85 हजार हेक्टरवरील पिकांना मिळाले जीवदान
केज – केज तालुक्यात दीड महिन्यानंतर पावसाला सुरुवात झाली असून मागील ४ दिवसांत पडलेल्या पावसाने धनेगाव येथील मांजरा धरणात ८.४३२ दलघमीची वाढ झाली आहे. पावसाने खरीप हंगामातील ८५ हजार हेक्टवरील पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. या वर्षी मे महिन्यात केज तालुक्यात दोनशेहून अधिक मिलिमीटर पडलेल्या पावसावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरण्या केल्या होत्या. पिकांच्या वाढीसाठी पावसाची गरज असताना जून महिना कोरडा गेला. त्यानंतर जुलै महिना तसाच कोरडा जाण्याच्या मार्गावर होता. वाऱ्याने जमिनीतील ओलावा संपला होता. पावसाच्या प्रतीक्षेत असताना २५ ते २६ जुलै दरम्यान झालेल्या दमदार पावसाने ८५ हजार हेक्टरवरील पिकांना जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे धनेगाव येथील मांजरा धरणात पाण्याची आवक वाढली असून ४ दिवसांत ८.४३२ दलघमीने वाढ झाली आहे. सध्या धरणात २९.४६ टक्के जिवंत पाणीसाठा असून ९९.२६७ दलघमी इतके पाणी आहे.