Breaking

फरार कृष्णा आंधळेपासून आमच्या जीवितास धोका; धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली भीती

Updated: June 19, 2025

By Vivek Sindhu

धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली भीती

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

बीड : मागील सहा महिन्यांपासून कृष्णा आंधळे हा फरार आहे. त्याचे मित्र गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, कृष्णाच्या रील्स बनविल्या जातात, बॅनर्स लावले जात आहे, त्याअर्थी तो कुठेतरी त्यांच्या संपर्कात आहे. परिणामी, आमच्या परिवारासह गावाला धोका होऊ शकतो. त्यामुळे प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे यास लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.

बीड येथील जिल्हा न्यायालयात १७ जून रोजी केज तालुक्यातील मस्साजोग येथील स्व. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी होती. त्यानिमित्त बीडमध्ये आलेले धनंजय देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. देशमुख म्हणाले की, जेल प्रशासनामध्ये गोंधळ चालू होता, त्यामुळे तेथील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. आरोपींना सुविधा पुरविल्या गेल्या असून सर्वजण एकाच जागेवर आहेत. त्यातील दोघा-दोघांना वेगवेगळ्या जेलमध्ये पाठविण्यात यावे, अशी मागणी अर्जात केलेली आहे. न्यायालयात जे काही डिजिटल पुरावे देण्यात आले आहेत, त्याबाबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे भाष्य करतील. तीन अर्जांवर २४ जून रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

कृष्णा आंधळे हा आरोपी मागील सहा महिन्यांपासून फरार आहे, त्याला लवकरात लवकर अटक करावी, अशी आमची मागणी आहे. कृष्णा आंधळे व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींचे बॅनर लावले जात आहेत, रील्स तयार केल्या जात आहेत. त्यामुळे एक भीतीयुक्त वातावरण तयार करण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. १६ जून रोजी आंदोलन करणार होतो. परंतु शाळेचा पहिला दिवस व शेतकऱ्यांच्या पेरण्या असल्याने आंदोलन पुढे ढकलले आहे. या संदर्भाने पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन आंदोलनाची पुढील दिशा व मागण्या त्यांना सादर करणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले.

आता पुढील सुनावणी २४ जून रोजी
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी १७ जून रोजी बीड जिल्हा न्यायालयात होती. मात्र न्या. व्यंकटेश पाटवदकर हे रजेवर असल्यामुळे पुढील सुनावणी आता २४ जून रोजी होणार असल्याची माहिती सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी दिली.

शहरातील बॅनर्स हटवली
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरवर राकाँ नेत्यासह संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा फोटो होता. प्रसिद्धी माध्यमांनी हा मुद्दा समोर आणताच शहरातील कराड याचा फोटो असलेले बॅनर्स काढून टाकण्यात आले.