Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

Updated: फेब्रुवारी 17, 2026

By Vivek Sindhu

बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी: आधुनिक तंत्रज्ञान आणि समृद्ध शेतीचा मंत्र देणाऱ्या तिसऱ्या ‘डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शना’चे भव्य उद्घाटन १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आष्टी येथे होणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा शुभारंभ होणार असून, माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून हे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे मानले जाणारे हे प्रदर्शन आष्टी येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयासमोर, नगर-जामखेड रोडवर भरवण्यात येणार आहे.

या सोहळ्याला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके यांच्यासह कृषी क्षेत्रातील दिग्गज अधिकारी व लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आनंद चॅरिटेबल संस्थेच्या वतीने आयोजित या तीन दिवसीय प्रदर्शनात शेतीतील नवे विचार आणि प्रगत तंत्रज्ञानाचा संगम पाहायला मिळेल. शेतकरी, कृषी तज्ज्ञ, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी हे प्रदर्शन दिशादर्शक ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे अत्याधुनिक कृषी अवजारे, शेतीमधील ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, सुधारित बियाणे आणि सेंद्रिय शेती पद्धतीची थेट प्रात्यक्षिके. याव्यतिरिक्त जलसंधारण, पशुपालन, मत्स्य व्यवसाय आणि कृषी प्रक्रिया उद्योगांबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. विविध शासकीय विभाग आणि नामांकित कृषी कंपन्यांचे स्टॉल्स याठिकाणी उभारण्यात आले असून, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हे एक प्रभावी ज्ञानपीठ ठरणार आहे. या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष भीमराव धोंडे, निमंत्रक डॉ. अजय धोंडे आणि अभयराजे धोंडे यांनी केले आहे.


Categories

Recent Posts