Breaking
Updated: नोव्हेंबर 15, 2025
*डागवडी-पांगरा परिसरात गांजाची लागवड; अमळनेर पोलिसांची कारवाई, आरोपी ताब्यात*
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअमळनेर : मौजे डागवडी-पांगरा परिसरातील मशोबरीतील शेतात परवानगीशिवाय गांजाची लागवड केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसांनी छापा टाकून 3 लाख 62 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जालंदर आबूबा मसल (वय 48, रा. डागवडी-पांगरा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा अमळनेर पोलिस ठाण्यात नोंदवला आहे. तपास सपोनि भगवंत सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
घटना 14 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. अमळनेर पोलिस ठाण्यात कार्यरत पोउपनि कृष्णा कांतीलाल चव्हाण यांना सकाळी गुप्त माहिती मिळाली की जालंदर मसल याने डागवडी-पांगरा येथील सर्व्हे नं. 27/1 मधील तुर शेतात बेकायदेशीर गांजाची लागवड केली आहे. माहितीची खातरजमा करून उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसील कार्यालयातील अधिकारी, दोन पंच, फॉरेन्सिक टीम आणि पोलिस पथकासह ठिकाणी छापा टाकण्यात आला.
शेताची पाहणी केली असता 4 ते 5 फूट उंचीची तब्बल 20 गांजाची झाडे आढळली. बांधावर लाल साडीत गुंडाळून ठेवलेला सुका गांजा देखील सापडला. झाडे उपटून एकत्र करण्यात आली. फॉरेन्सिक तज्ञांनी सॅम्पल घेतल्यानंतर उर्वरित मालाची वजनकाट्याने मोजणी करण्यात आली. चार प्लास्टिक गोण्यांमध्ये मिळालेला ओला आणि सुका गांजा एकूण 12.075 किलो निघून त्याची एकूण किंमत 3,62,250 रुपये ठरली. मुद्देमाल पंचासमक्ष सीलबंद करण्यात आला.
जालंदर मसल याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजाची लागवड केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायदा कलम 8(ब), 20, 20(ब)(i), 20(ब)(ii) अन्वये अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
सदर कारवाईत फॉरेन्सिक अधिकारी, महसूल अधिकारी, पंच, पोलीस कर्मचारी यांचा सहभाग होता. तपास अमळनेर पोलिसांनी सुरू केला असून अंमली पदार्थांविरोधातील ही महत्त्वपूर्ण कारवाई ठरत आहे.