अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील विविध वीज प्रलंबित कामांवर तोडगा काढण्यासाठी ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आमदार नमिता मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघातील वीज प्रश्नांबाबत ठोस भूमिका मांडत अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या.
केज मतदारसंघातील वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांचा ठोस पाठपुरावा
आ. मुंदडा यांनी आरडीएसएस (RDSS) योजनेअंतर्गत केज मतदारसंघात नवीन 33 केव्ही उपकेंद्र उभारण्याची, जुन्या उपकेंद्रांमध्ये अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवण्याची आणि कृषी वाहिन्यांवरील ओव्हरलोड कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात 63 केव्हीए व 100 केव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवण्याची जोरदार मागणी केली.
तसेच, केज शहरासह ग्रामीण भागातील उच्चदाब (HT) व निम्नदाब (LT) लाईनचे पोल आणि तारा निकृष्ट अवस्थेत असल्याने त्यांचे तातडीने बदल करावेत, अशीही आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
सौर कृषी वाहिनीअंतर्गत सुरू असलेली अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, रिक्त अभियंता पदे भरण्यात यावीत, अशी ठोस भूमिका त्यांनी मांडली. कोरेगावसारख्या गावांचा आरडीएसएस योजनेत समावेश करून नवीन 11 केव्ही लाईन मंजूर करण्याची, विविध उपकेंद्रांवर आयसोलेटर बसवण्याची, ट्रान्सफॉर्मर ऑईल आणि नव्या ट्रान्सफॉर्मरची उपलब्धता सुनिश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली.
वाघाळा, आडस, पाथरा येथे 132 केव्ही आणि बरड येथील 220 केव्ही उपकेंद्रांपासून नवीन 33 केव्ही फीडर टाकण्यासाठी योजना राबवण्याची गरज त्यांनी मांडली. युसुफवडगाव, धनेगाव, जवळबन, साळेगाव या उपकेंद्रांमध्ये व्हिसीबी, सीटी, पीटी, आयसोलेटर व अर्थिंगची दुरुस्ती करून त्यांची क्षमता वाढवण्यावरही भर दिला.
अंबाजोगाई उपविभागात नवीन दोन उपविभाग तयार करावेत, पठाण मांडवा गावाचा अंबाजोगाई विभागात समावेश करावा, तसेच 519 उच्चदाब व 489 लघुदाब पोल, 107 वितरण बॉक्स बदलण्याची, 47 किलोमीटर नवीन 11 केव्ही लाईन उभारण्याची आणि शेती फिडरवरील भार कमी करण्यासाठी 22 लाईन कपॅसीटर बसवण्याची तातडीची गरज त्यांनी बैठकीत ठळकपणे मांडली.
अंबाजोगाईतील कनिष्ठ व सहाय्यक अभियंत्यांच्या रिक्त पदांची भरती त्वरीत करावी यासाठीही त्यांनी ठोस पाठपुरावा केला. आ. नमिता मुंदडा यांच्या या ठोस भूमिकेमुळे केज आणि अंबाजोगाई भागातील नागरिकांना दर्जेदार वीज सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची आशा निर्माण झाली आहे.