Breaking

.’ज्ञानराधा’च्या २७ मालमत्ता जप्त करा; प्रशासनाची कोर्टात धाव, ५ जानेवारीला महत्त्वाची सुनावणी

Updated: जानेवारी 2, 2026

By Vivek Sindhu

५ जानेवारीला महत्त्वाची सुनावणी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: ज्ञानराधा मल्टिस्टेट सहकारी संस्थेतील गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने आता कायदेशीर हालचाली अधिक वेगवान केल्या आहेत. संस्थेच्या विविध जिल्ह्यांतील २७ मालमत्तांच्या जप्तीचे आदेश कायम करावेत, या मागणीसाठी सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी (SDM) कविता जाधव यांनी बीड जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. या अर्जासोबत त्यांनी शपथपत्रही सादर केले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि इतर आरोपींच्या मालकीच्या मालमत्तांवर प्रशासनाने आधीच टाच आणली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ‘स्पेस ऑलिम्पिया’ इमारतीतील कार्यालये, गंगापूर तालुक्यातील सय्यदपूर येथील जमिनी, तसेच बीडमधील कसबे, मांजरसुंबा आणि बहिरवाडी येथील शेकडो हेक्टर जमिनींचा समावेश आहे. याशिवाय आरोपींची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत.

कलम ७ च्या पोटकलम ४ अन्वये या मालमत्तांची जप्ती कायम करून त्या शासनजप्त घोषित कराव्यात, अशी मागणी एसडीएम कविता जाधव यांनी केली आहे. जप्त मालमत्तांच्या वसुलीतून मिळणारी रक्कम गुंतवणूकदारांना योग्य पद्धतीने वाटप करण्यासाठी न्यायालयाचे निर्देश आवश्यक आहेत. २३ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सरकारी वकील बी. एस. राख यांनी बाजू मांडली. यावेळी आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले होते. न्यायालयाच्या आगामी निर्णयाकडे आता लाखो ठेवीदारांचे लक्ष लागले असून, मालमत्ता जप्तीचा निर्णय झाल्यास गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


Categories

Recent Posts