Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

सज्जन शक्ती एकवटल्याशिवाय राजकारणाचे गुन्हेगारीकरण संपणार नाही – दिपक करंजीकर

Updated: जानेवारी 13, 2026

By Vivek Sindhu

दीनदयाळ बँकेच्या युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा समारोप

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

दीनदयाळ बँकेच्या युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा समारोप

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १० ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत तीनही दिवस युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या १६३ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन सौभाग्य मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. या प्रबोधनपर व्याख्यानमालेचा समारोप सोमवार, दि.१२ जानेवारी रोजी दिपक करंजीकर (मुंबई) यांच्या ‘राजकारणाचे होत असलेले गुन्हेगारीकरण आणि त्यावरील उपाय’ या विषयावरील व्याख्यानाने झाला.

कार्यक्रमाची सुरूवात भारतमाता, राजमाता माँ साहेब जिजाऊ, युगपुरूष स्वामी विवेकानंद, पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर बॅंकेच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते म्हणून दिपक करंजीकर (मुंबई), कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अनिकेत लोहिया (कार्यवाह, मानवलोक), बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्‍वर देशमुख, संचालक मकरंद कुलकर्णी सोनेसांगवीकर, प्रा.अशोकराव लोमटे, मुख्यकार्यकारी अधिकारी महेश उत्तम शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सभागृहात संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान संचालक राजाराम धाट, संचालक सौ.शरयूताई हेबाळकर, संचालक जयकरण सुरेशकांबळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तृतीय पुष्प गुंफताना दिपक करंजीकर (मुंबई) यांनी सांगितले की, आज राजकारण आणि गुन्हेगारीकरण हे दोन समानार्थी शब्द वाटावेत अशी परिस्थिती आहे. गुन्हेगारांची अंतिम जागा ही राजकारण आहे असे समाज मत दृढ होत गेले. त्याचे परिणाम आज सभोवताली दिसून येत आहेत. २२ वर्षांनंतर देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील. परंतु, भारत आज ४ थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असताना आपल्याला या विषयावर बोलावे लागते आहे. हे मोठे दुर्दैव आहे. आपण विसंगत विषयावर बोलत आहोत. मागील ७७ वर्षांत देशात फक्त राजकारण बळकट होत गेले. गुन्हे दाखल असलेले, खटले सुरू असलेले लोक आज लोकप्रतिनिधी आहेत. जे २२ टक्के एवढे आहेत. निवडणुकीत आपण यांना विरोध करीत नाहीत. तर येणाऱ्या पिढ्यांना आपण गुन्हेगारीकरणाचा वारसा देत आहोत की, काय असे वाटते. आज गुन्हेगारीचे सार्वत्रिकीकरण झाले आहे. तेव्हा १४५ कोटी लोक काय करतात..? ते सुजाण नागरिक प्रश्न का विचारत नाहीत. गुन्हेगारीकरण का झाले..? कारण, आज या देशातील विचारवंत, लेखक, युवा पिढी, महिला वर्ग शांत आहे. नेमके काय झाले आहे यांना. या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल. देशात १९ ते ४२ वयोगटातील ४५ कोटी लोक आहेत. जगातील सर्वाधिक तरूणांची शक्ती आपल्याकडे आहे. त्यामुळे आपण आज व्यवस्थेला राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर प्रश्न विचारला नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. आज सगळ्या राजकीय पक्षात गुन्हेगारीकरण होणं ही कॉमन गोष्ट झाली आहे. पाशवी बहुमताच्या आधारावर राज्यकर्ते त्यांना हवे तसे करीत आहेत. आपण रामराज्याच्या केवळ गप्पा मारतो. आज एकही नि:ष्कलंक माणूस राजकारणात येत नाही. निवडून येण्याचा निकष तपासला जातो. चांगले लोक मतदान करीत नाहीत. तर ते मतदानाच्या दिवशी सहलीवर जाणे पसंत करतात. कर भरणारा मध्यमवर्गीय, सामान्य माणूस मतदान प्रक्रियेतून बाहेर पडतो आहे. व मग त्यामुळे गुन्हेगार निवडून येतो. मी एकटा काय करू म्हणणारे ५५ टक्के लोक आज निवडणूक प्रक्रियेपासून दूर होत चालले आहेत. म्हणून ४५ टक्के लोक सत्तेवर बसले आहेत. मतदान न करून आपणच राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे दुष्ट चक्र निर्माण करीत आहोत. सामान्य माणसाची निष्क्रियता याला जबाबदार आहे. आपल्या देशातून परराष्ट्रात गेलेले तरूण आज भारतात रहावे असे काय आहे असे म्हणत असेल, त्याला वाटत असेल तर हा चिंतेचा विषय आहे. म्हणून तरूणांना संधी द्यावी लागेल. गुन्हेगारीकरण हा कँन्सर झाला आहे. आला समाज करूणेकडून दयेकडे येत चालला आहे‌. वागण्यातील तफावत, नैतिकता, कृतिशील समाज, चारित्र्यवान कार्यकर्ते, संस्कृतींची एकसंधता, व्यवस्थेत शिस्त, दुसऱ्यांविषयी आदरभाव, कर्तृत्ववान नेतृत्व, भय व भुक मुक्त समाज निर्मिती, भुमिका घेणे, विचार समजून घ्यावा लागेल. दबावगट तयार करावा लागेल. राजकीय व आर्थिक धोरणे निश्चिती यासंदर्भात आपण सर्वांनी मिळून पुढाकार घेतला तर राजकीय व्यवस्थेचे गुन्हेगारीकरण रोखता येईल, सुप्त सज्जन शक्ती एकवटल्याशिवाय राजकारणाचे गुन्हेगारीकरण संपणार नाही असा आशावाद व्याख्याते करंजीकर यांनी व्यक्त केला. व्याख्यानाच्या प्रारंभापूर्वी कै.बाळासाहेब दीक्षित ज्ञानसाधना प्रतिष्ठान, उदगीर यांनी वंदे मातरम् या गीताच्या सार्धशतीनिमित्त देशभक्तीचा गौरव सोहळा करण्याच्या उद्देशाने भारतमातेचं छायाचित्र व वंदे मातरम् गीत असलेल्या सुंदर भित्तीपत्रिका तयार केल्या या भित्तीपत्रिकेंच प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरूवातीला पाहुण्यांचा परिचय बँकेचे अधिकारी अनंतराव देशपांडे यांनी करून दिला. सुत्रसंचालन करून बँकेच्या अधिकारी प्रतिभा गोस्वामी यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रख्यात गायक जयेंद्र कुलकर्णी यांनी वैयक्तिक पद्य सादर केले. तर कार्यक्रमाची सांगता शांतीमंत्राने झाली. यावर्षी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प पार्थ बावस्कर (छत्रपती संभाजीनगर) यांनी वंदे मातरम् या विषयावर गुंफले. यावेळी विशेष अतिथी म्हणून डॉ.शंकरराव धपाटे (अधिष्ठाता, स्वाराती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, अंबाजोगाई) हे उपस्थित होते. व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प डॉ.काशिनाथ देवधर (पुणे) यांनी भारताची संरक्षण सिध्दता या विषयावर गुंफले. यावेळी विशेष अतिथी म्हणून रमेश शेषेराव कराड (उपाध्यक्ष, वैद्यनाथ बँक, परळी वैजनाथ) हे उपस्थित होते. तीनही दिवस अंबाजोगाईच्या विविध क्षेत्रातील मान्यवर, माता, भगिनी, ज्येष्ठ नागरिक, रसिक श्रोते आणि युवक वर्गाने सहकुटूंब सहपरिवार उपस्थित राहून युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.


Categories

Recent Posts