Breaking
Updated: सप्टेंबर 8, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : बीड जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी भूसंपादन प्रक्रियेतील अडथळे दूर करून काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड-अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू होणार असून बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष भर दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी कविता जाधव, सहायक कार्यकारी अभियंता मुकुंद पुं. नाईक, वरिष्ठ अभियंता सुरेश कुमार मंडल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, वसीमा शेख व गौरव इंगोले यांनीही सहभाग घेतला.
जिल्हाधिकारी जॉन्सन म्हणाले की, भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. विभागीय समन्वय साधून आवश्यक जमीन रेल्वेला उपलब्ध करून द्यावी. राष्ट्रीय महामार्ग विभागाने ब्रम्हवाडी येथील उड्डाणपूलाचे काम तातडीने सुरू करावे. तसेच सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेबाबत अहवाल वेळेत सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड रेल्वे स्थानकास भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बीड-परळी रेल्वेमार्गाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. स्थानकातील सुविधा तपासून त्यात सुधारणा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपमुख्य अभियंता डी.डी. लोळगे, मध्य रेल्वे अहमदनगरचे कार्यकारी अभियंता लोकेंद्रकुमार सिंग, वरिष्ठ अभियंता एल.पी. नायक, अमरकुमार अकेला व सुरेश कुमार मंडल उपस्थित होते.