Breaking

कॉफी शॉप चालकास चाकू गळ्याला लावून लुटताना तिघे जेरबंद

Updated: June 13, 2025

By Vivek Sindhu

कॉफी शॉप चालकास चाकू गळ्याला लावून लुटताना तिघे जेरबंद

WhatsApp Group

Join Now

केज पोलिसांची कारवाई

केज – केज येथील बसस्थानकात बसची वाट पाहत उभ्या असलेल्या कॉफी शॉप चालकास काम असल्याचे सांगून बाजूला नेत गळ्याला चाकू लावून खिशातील जबरदस्तीने पैसे काढून घेणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

केज शहरातील कॉफी शॉप चालक अमरजीत विजयकुमार धपाटे हे ११ जून रोजी सकाळी ११ वाजता कॉफी मटेरीअलचे पार्सल घेण्यासाठी बसस्थानकात बसची वाट पाहत थांबले असता त्यांना दोन अनोळखी इसमांनी तुमच्याकडे काम असल्याचे सांगून बसस्थानकाच्या बाजुला कोपऱ्यात नेऊन चाकू त्यांच्या गळयाला लावून खिशातील पैसे काढण्यास सांगितले. त्यांच्या खिशातील २ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्यानंतर अमरजित धपाटे यांनी आरडाओरडा केला.

त्यानंतर बसस्थानकातील लोकांसह पोलीस नाईक त्रिंबक सोपणे, जमादार विष्णू नागरगोजे हे धावले. त्यांनी पळून जात असलेल्या अन्वर ऊर्फ असलम दस्तगीर सय्यद, (रा. वडसावीत्री नगर, परळी जि. बीड), अंबादास सुखदेव साळोकार (रा. घारपुरी ता. खामगाव जि. बुलढाणा), हमीद दाऊत शेख (रा. धारुर ) या तिघांना पकडले. अमरजित धपाटे यांच्या तक्रारीवरून या तिघा गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

दोघे सराईत गुन्हेगार, हमाल त्यांचा साथीदार

पोलिसांनी पकडलेल्या अन्वर उर्फ असलम सय्यद हा खुनाच्या गुन्ह्यात लातूर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिलेला आरोपी असून तो कारागृहातून पॅरोलवर आल्यापासून तो पुन्हा कारागृहात परत गेला नसून तो फरार असल्याची नोंद आहे. दुसरा आरोपी अंबादास साळोकर याच्यावर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील ठाण्यात चोरीसह इतर १६ गुन्हे दाखल आहेत. तर तिसरा आरोपी हमीद शेख हा बसस्थानकातील हमाल असून तो त्यांना टीप देत होता. या टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल पोलीस निरीक्षक वैभव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.