अंबाजोगाई : रेणा सहकारी साखर कारखान्यातून उचल म्हणून घेतलेले पाच लाख रुपये परत मागितल्याच्या कारणावरून एका वाहन मालकाला वस्तऱ्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश राजाभाऊ राठोड (रा. कुरणवाडी) असे जखमी वाहन मालकाचे नाव असून ते रेणा साखर कारखान्याचे वाहन मालक आहेत. पोलीसांकडील तक्रारीनुसार, २०२० मध्ये कारखान्यातील कामासाठी उचल म्हणून दिलेली पाच अलख रुपयांची रक्कम आरोपींनी अनेक वेळा मागणी करूनही परत केली नाही. अखेर दिनांक २ जुलै रोजी दुपारी या मुद्द्यावरून वाद झाला व आरोपींनी गणेश राठोड यांना वस्तऱ्याने मारहाण केली. त्याचबरोबर फिर्यादीच्या वडिलांनाही लाथाबुक्यांनी व चापटांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.
गुलाम रसुल पठाण, अख्तर अली सिकंदर शेख, हसन सिकंदर पठाण व हसन शाहानूर पठाण (सर्व रा. साकुड, ता. अंबाजोगाई) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत असून, या घटनेतील तथ्य तपासून पाहत असल्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी सांगितले. दरम्यान, गणेश राठोड यांना किरकोळ दुखापत झाल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.