माजलगाव : तालुक्यातील पात्रुड आणि लमाणवाडी तांडा परिसरात शेतकऱ्यांना बनावट रासायनिक खत विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी रामेश्वर परसराम पवार या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील खत निरीक्षक मंजुश्री बबनराव कवडे यांनी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली होती. त्यांच्या तपासणीत पवार याच्या दोन्ही कृषी सेवा केंद्रांमधून खत विक्री संदिग्ध, अनधिकृत व फसवणूक करणारी असल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदार शेतकरी शेख तालेब शेख अय्युब यांनी पात्रुड येथील जगदंबा कृषि सेवा केंद्रातून ईफको कंपनीचे एन. पी. के. 10:26:26 ग्रेडचे सहा बॅगा खत खरेदी केल्याची माहिती कृषी विभागाला दिली होती. खताचे अधिकृत बिल दिले गेले नव्हते आणि व्यवहार डिजिटल पद्धतीने झाला होता. बॅगची तपासणी केल्यावर ती बनावट असल्याचा संशय ईफको कंपनीच्या प्रतिनिधीनेही व्यक्त केला.
याच दरम्यान दुसऱ्या शेतकऱ्यानेही अशाच स्वरूपाचे खत खरेदी केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या शेतात बॅगा सीलबंद स्थितीत सापडल्याने खताचा नमुना पंचासमक्ष घेण्यात आला. त्यानंतर जिल्हा गुण नियंत्रण भरारी पथकाला याची माहिती देण्यात आली.
भरारी पथकाच्या तपासणीत जगदंबा कृषि सेवा केंद्र पात्रुड आणि जगदंबा अँग्रो एजन्सी लमाणवाडी तांडा या दोन्ही खत विक्री केंद्रांवर नियमबाह्य व संशयित कारभार होत असल्याचे स्पष्ट झाले. पात्रुड येथील केंद्राचा परवाना २५ जून २०२४ रोजी संपला असूनही खत विक्री सुरू होती. याशिवाय, खत साठा रजिस्टर अपूर्ण, दरफलक अनुपस्थित, शेतकऱ्यांना विक्री बिले न दिले जाणे तसेच युरिया खत कमाल दरापेक्षा जास्त किंमतीने विकले जात असल्याचे निष्पन्न झाले.
लमाणवाडी तांडा येथील विक्री केंद्रावरही बरेच नियमभंग आढळले. खत साठा व विक्री नोंदी रजिस्टर नसणे, बिले न दिले जाणे, गोदामातील व पाँस मधील साठ्यात तफावत दिसणे यामुळे संशय अधिक गडद झाला. यावेळी शेतकऱ्यांकडील २४ रिकाम्या, १३ न वापरलेल्या व ४ फोडलेल्या खताच्या बॅग ताब्यात घेण्यात आल्या.
दोन्ही केंद्रांचा चालक एकच म्हणजे रामेश्वर परसराम पवार असल्याचे निष्पन्न झाले आहे. या विक्रेत्याने ईफको कंपनीच्या नावाचा गैरवापर करून बनावट खताची विक्री केली असून त्यामुळे शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणी खत नियंत्रण आदेश 1985, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 व भारतीय न्याय दंड संहिता 2023 अंतर्गत संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.