Breaking

अखेर जीएसटी अधिकारी सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणी प्रदीप फाटे याच्यावर गुन्हा दाखल

Updated: जानेवारी 24, 2026

By Vivek Sindhu

प्रदीप फाटे याच्यावर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: बीड येथील वस्तू व सेवाकर कार्यालयातील (GST) अधिकारी सचिन जाधवर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांचे वरिष्ठ सहकारी प्रदीप फाटे यांच्याविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन जाधवर यांनी प्रदीप फाटे यांच्या सततच्या मानसिक छळाला आणि बेकायदेशीर कामांसाठी असलेल्या दबावाला कंटाळून आपले जीवन संपवल्याचा आरोप त्यांच्या पत्नी मयुरी सचिन जाधवर यांनी तक्रारीत केला आहे. सचिन जाधवर हे मागील तीन वर्षांपासून बीड येथील जीएसटी कार्यालयात कार्यरत होते.

फिर्यादीनुसार, आरोपी प्रदीप फाटे हा जाधवर यांना कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांसमोर अपमानित करत असे आणि त्यांना कनिष्ठ दर्जाचे असल्याचे हिणवून शिवीगाळ करत असे. जाधवर जेव्हा जेवणासाठी घरी जात, तेव्हाही आरोपी त्यांना व्हिडिओ कॉल करून किंवा फोन करून वारंवार त्रास देत असे. विशेष म्हणजे, हुले कन्स्ट्रक्शन आणि फाटे यांच्या नातेवाईकांच्या फाईल्सचे बेकायदेशीर काम करण्यासाठी जाधवर यांच्यावर मोठा दबाव टाकला जात होता. “फाटे यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे,” अशा शब्दांत जाधवर यांनी आपली व्यथा पत्नीकडे मांडली होती.

दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सचिन जाधवर नेहमीप्रमाणे कार्यालयात गेले, मात्र संध्याकाळी ते घरी परतले नाहीत. शोधाशोध केल्यानंतर १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह कपिलधारवाडी शिवार परिसरात बेशुद्धावस्थेत आढळला. त्यांच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली असून, त्यात प्रदीप फाटे यांच्या त्रासामुळेच आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बालराजे भागवत दराडे करत आहेत.


Categories

Recent Posts