Breaking

बनावट वाटणीपत्राद्वारे पुतण्याची जमीन हडपण्याचा प्रयत्न

Updated: एप्रिल 3, 2026

By Vivek Sindhu

तिघा विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाईत पिता-पुत्रावर गुन्हा दाखल

अंबाजोगाई: जुन्या स्टॅम्प पेपरचा वापर करून आणि बनावट स्वाक्षऱ्यांच्या आधारे खोटे वाटणीपत्र तयार करून पुतण्याची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार अंबाजोगाई शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी नातेसंबंधातील पिता-पुत्रावर फसवणुकीसह विविध कलमान्वये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील फिर्यादी नितीन मधुकर ठोंबरे (वय ४१, रा. प्रशांत नगर, अंबाजोगाई) आणि आरोपी हे जवळच्या नात्यातील आहेत. आरोपी जनार्धन भारत ठोंबरे हे फिर्यादीचे चुलत चुलते असून, दुसरा आरोपी अजित भारत ठोंबरे हा त्यांचा मुलगा आहे. आरोपींनी संगनमत करून ३ फेब्रुवारी १९९२ रोजीचे एक बनावट वाटणीपत्र तयार केले. विशेष म्हणजे या दस्तावर फिर्यादीच्या आजोबांच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

या फसवणुकीचा उलगडा एका तांत्रिक बाबीमुळे झाला. आरोपींनी १९९२ च्या बनावट दस्तात ज्या घराचा क्रमांक नमूद केला होता, तो घर क्रमांक नगर परिषदेने १९९८ नंतर अस्तित्वात आणला होता. तसेच संबंधित बॉण्ड रायटरनेही असा कोणताही दस्त ऐवज लिहिला नसल्याचे स्पष्ट केले. या बनावट दस्ताच्या आधारे आरोपींनी तलाठ्याशी संगनमत करून गट क्रमांक ३६५/२ मधील जमिनीच्या महसूल अभिलेखात स्वतःची नावे लावून घेतली होती.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून जनार्धन ठोंबरे आणि अजित ठोंबरे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३६(३), ३३८, ३४०(२) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गोंद हे करत आहेत.


Categories

Recent Posts