Breaking
Updated: मार्च 27, 2026
हायवा टिपरच्या धडकेनंतर कारने घेतला पेट, माय-लेकराचा कारमध्येच होरपळून दुर्दैवी अंत
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआष्टी: बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावर आष्टी तालुक्यातील कापसी फाटा येथे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास एक काळीज पिळवटून टाकणारी भीषण दुर्घटना घडली आहे. खडीने भरलेल्या एका भरधाव हायवा टिपरने कारला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने कारने भीषण पेट घेतला. या दुर्दैवी घटनेत कारमधील ऋषिकेश श्रीहरी पुरी (वय २६) आणि त्यांच्या आई पुष्पा श्रीहरी पुरी (वय ५०) या माय-लेकरांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. हे कुटुंब मूळचे अंबाजोगाई तालुक्यातील भारज येथील असून सध्या केज तालुक्यातील साळेगाव येथे स्थायिक होते. अध्यात्मिक वारसा लाभलेल्या या कुटुंबावर काळाने घातलेल्या या घालामुळे संपूर्ण जिल्ह्यातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले ह.भ.प. श्रीहरी पुरी यांचा मुलगा ऋषिकेश हा आपल्या आईला घेऊन नातेवाईकांच्या तेराव्याच्या विधीसाठी गावी निघाला होता. त्यांची स्विफ्ट डिझायर कार आष्टी-डोईठाण मार्गे बीडकडे जात असताना समोरून येणाऱ्या हायवा टिपरने (क्रं. एम-१६ सीडी-७३०५) कारला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की कारने तात्काळ पेट घेतला. इंधनाचा भडका उडाल्याने काही क्षणातच कार आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाली आणि माय-लेकरांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र आगीच्या रौद्र रूपामुळे त्यांना गाडीच्या जवळ जाणेही अशक्य झाले होते. क्षणार्धात आगीच्या ज्वालांनी संपूर्ण कारला वेढले, ज्यामुळे या दोघांचाही आतमध्येच अंत झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे ऋषिकेश याचा उद्या शनिवारी २८ मार्च रोजी वाढदिवस होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी आणि प्रवाशांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीचा वेग अधिक असल्याने त्यांना वाचवण्यात यश आले नाही. या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.