केज – बसने समोर चालत असलेल्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला असून तर एक जण गंभीर झाला. हा अपघात कळंब – अंबाजोगाई रस्त्यावरील सुर्डी फाटा (ता. केज) येथे बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास झाला.
कळंब तालुक्यातील डिकसळ येथील गणेश बंकट अंबिरकर (वय ४५) व अब्बास शेरखान पठाण (वय ६०, रा. इस्लामपुरा, कळंब) हे दोघे बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (एम. एच. २५ झेड. ३४६३) कळंब – अंबाजोगाई रस्त्याने जात असताना सुर्डी फाटा येथे कळंबकडून वसमतकडे जात असलेल्या स्वारगेट – वसमत या एसटी बसने (एम. एच. २० बी. एल. ५८५०) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात गणेश अंबिरकर यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अब्बास पठाण हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर बस चालकाने एसटी बस ही थेट युसुफवडगावला नेऊन पोलीस ठाण्यात नेऊन लावली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला नव्हता.