Breaking
Updated: फेब्रुवारी 22, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: तालुक्यातील डीघोळअंबा गावाजवळ शनिवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास एका सराफा व्यापाऱ्याला अडवून त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकत अंदाजे ५ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धारूर तालुक्यातील बिभीषण गणपती गायके हे व्यापारी आपल्या दुचाकीवरून जात असताना दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार अज्ञात हल्लेखोरांनी हा धाडसी दरोडा टाकला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि विशेषतः व्यापारी वर्गात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बिभीषण गायके हे दर शनिवारी व्यवसायानिमित्त डीघोळअंबा गावात दागिने विक्रीसाठी जातात. शनिवारी सकाळी ते जुन्या होळ मार्गाने डीघोळअंबा शिवारातील दर्ग्याजवळ पोहोचले असता पाठीमागून आलेल्या २० ते २५ वयोगटातील चार तरुणांनी त्यांची दुचाकी अडवली. आरोपींनी काहीही विचार करण्यापूर्वीच गायके यांच्या डोळ्यात लाल तिखट फेकले ज्यामुळे त्यांना काहीही दिसणे अशक्य झाले. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्याकडील दागिन्यांची बॅग हिसकावून पोबारा केला. या बॅगेत १२ ग्रॅमचे गंठण, ४ ग्रॅमचे झुंबर, कानफुले आणि मंगलसूत्र असे एकूण ५ लाख ८५ हजार रुपये किमतीचे मौल्यवान दागिने होते.
घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. लुटारूंनी आपले चेहरे रुमालाने बांधले होते अशी माहिती पीडित व्यापाऱ्याने पोलिसांना दिली आहे. भरवस्तीच्या आणि वर्दळीच्या रस्त्यावर अशा प्रकारे धाडसी चोरी झाल्याने खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत.