Breaking

परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

Updated: मार्च 14, 2026

By Vivek Sindhu

दोन नराधमांविरुद्ध 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी: तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अमानवीय घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी चक्रे फिरवली आहेत.

पीडित मुलगी १६ वर्षांची असून आरोपींनी तिला गोड बोलून आपल्या घरी बोलावले होते. मुलगी घरात प्रवेश करताच आरोपींनी घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर एका नराधमाने पीडितेचे हात-पाय घट्ट बांधले आणि ती ओरडू नये म्हणून तिच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबला. यानंतर दोन्ही नराधमांनी तिच्यावर अतिशय क्रूरपणे लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर पीडितेची सुटका करताना नराधमांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला संपवून टाकू, असे म्हणत तिला दहशतीखाली ठेवले.

धमकीमुळे प्रचंड घाबरलेल्या मुलीने कशीबशी आपली सुटका करून घर गाठले आणि घडलेला सर्व संतापजनक प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. पालकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ परळी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेची दखल घेत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४, १२७(२), ३५१(२), ३५२, ३(५) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) २०१२ च्या कलम ४ आणि १७ नुसार गुन्हा रजिस्टर नंबर १२५/२०२६ दाखल केला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून या प्रकरणाचा सखोल तपास अंबाजोगाई उपविभागाचे पिंक पथक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव करत आहेत.


Categories

Recent Posts