Breaking
Updated: जानेवारी 8, 2026
११ वीज उपकेंद्रांमध्ये नवे ट्रान्सफॉर्मर मंजूर
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकडा: आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वीज वाहिनी २.०’ योजनेअंतर्गत ११ वीज उपकेंद्रांमध्ये अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले आहेत. आमदार सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महावितरणने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे या तिन्ही तालुक्यांतील कृषी वीजपुरवठा अधिक सक्षम होणार आहे.
शेतकऱ्यांना भेडसावणारा वाढता विद्युत भार, वारंवार होणारे तांत्रिक बिघाड (फॉल्ट), कमी दाबाने होणारा वीजपुरवठा आणि उपकेंद्रांची अपुरी क्षमता या समस्या आमदार सुरेश धस यांनी शासन आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. या समस्यांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून सरकारने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
या उपकेंद्रांचा होणार कायापालट मंजूर झालेल्या निर्णयानुसार, ३३/११ के.व्ही. उपकेंद्र आष्टी आणि ३३/११ के.व्ही. उपकेंद्र धानोरा येथे १० एम.व्ही.ए. क्षमतेचे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहेत. तसेच सावरगाव, जळगाव (कडा साखर कारखाना), डोईठाण, कुसळंब, लांबरवाडी, कोतन, दासखेड, घाटशीळ पारगाव आणि भायाळ या उर्वरित नऊ उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी ५ एम.व्ही.ए. क्षमतेचे अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवले जातील.
शेती उत्पादनात होणार वाढ नव्या ट्रान्सफॉर्मरमुळे कृषी पंपांना स्थिर आणि अखंड वीजपुरवठा मिळणार आहे. कमी व्होल्टेजची जुनी समस्या आता दूर होणार असून भारनियमन करणेही सोपे जाईल. महत्त्वाचे म्हणजे, शेतकऱ्यांना आता दिवसा दर्जेदार वीज उपलब्ध होणार असल्याने सिंचन करणे सोपे होईल. याचा थेट सकारात्मक परिणाम शेती उत्पादनावर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर होणार आहे.
आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारामुळे हा जटील प्रश्न सुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश धस यांचे आभार मानले आहेत.