Breaking
Updated: सप्टेंबर 3, 2025
बीडमध्ये धाडसी घरफोडी, सुमतीनगरात तीन घरांवर चोरट्यांचा डल्ला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : शहरातील सुमतीनगर वासनवाडी शिवार परिसरात अज्ञात चोरट्यांनी तीन घरांचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना 1 सप्टेंबरच्या रात्री 10 वाजता ते 2 सप्टेंबरच्या सकाळी 7.20 वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी ठेकेदार बाळासाहेब नवनाथ कदम (वय 34, रा. बेलवाडी, ह.मु. सुमतीनगर, बीड) यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कदम हे पत्नी अंजना आणि मुलगा अभिनव (वय 5) यांच्यासह सुमतीनगर येथे वास्तव्यास आहेत. 31 ऑगस्ट रोजी कुटुंबासह गावी गेलेल्या कदम यांना 2 सप्टेंबर रोजी सकाळी शेजाऱ्यांकडून घरफोडीची माहिती मिळाली. तत्काळ ते घरी परतले असता, त्यांच्या घराचे कडी-कोंडे तुटलेले दिसले. कपाट उघडे असून, आत ठेवलेली रोख 1 लाख 28 हजार रुपये चोरीस गेलेले असल्याचे त्यांनी पाहिले. चोरीस गेलेली रक्कम 1,28,000 रुपये इतकी असल्याचे फिर्यादीने स्पष्ट केले. कदम यांच्या शेजारी राहणारे प्रदीप गणेश पवार व संजय श्रीधर ठिगळे यांच्या घराचेही कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याचे समोर आले आहे. बीड ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.