Breaking
Updated: डिसेंबर 12, 2025
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी डिझेलने भरलेल्या टँकरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीड तालुक्यातील मांजरसुंबा घाट आणि पाली दरम्यान असलेल्या कोळवाडी गावाजवळ हा थरार पाहायला मिळाला. टँकर पलटी होऊन लागलेल्या या आगीत डिझेलचा भडका उडाल्याने महामार्गावर आगीचे रौद्ररूप पाहायला मिळाले.
शुक्रवारी सायंकाळी ५:१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, पेट्रोल पंपावर डिझेल घेऊन जाणारा हा टँकर सोलापूर-धुळे महामार्गावरून जात होता. मांजरसुंबा घाटातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला आणि काही अंतरापर्यंत रस्त्यावर घसरत गेला. यावेळी मागून येणाऱ्या वाहनांनी अंदाज न आल्याने टँकरला धडक दिली, ज्यामुळे टँकरचा प्रचंड स्फोट झाला.
रस्त्यावर आगीचे साम्राज्य
स्फोटानंतर टँकरमधील डिझेल रस्त्यावर सांडल्याने आगीचा लोळ सुमारे १०० ते २०० मीटरपर्यंत पसरला. आगीची तीव्रता इतकी भयानक होती की, रस्त्यालगतची झाडेही यात जळून खाक झाली. आकाशात धुराचे मोठे लोट पसरले होते, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या भीषण आगीत टँकर पूर्णपणे जळून कोळसा झाला आहे.
वाहतूक ठप्प, प्रशासनाची धाव
भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे सोलापूर-धुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. स्फोटाच्या आवाजाने कोळवाडी आणि पाली परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. टँकरचालकाबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही..