Breaking

बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा होणार कायापालट; नूतनीकरणासाठी ८.१९ कोटींचा निधी मंजूर

Updated: जानेवारी 1, 2026

By Vivek Sindhu

नूतनीकरणासाठी ८.१९ कोटींचा निधी मंजूर

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: १ जानेवारी २०२६ बीड शहरातील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने आज, १ जानेवारी २०२६ रोजी या कामासाठी ८ कोटी १९ लक्ष ७० हजार रुपयांच्या विकास कामाला शासन मान्यता प्रदान केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने बीडकरांना ही मोठी भेट दिली असून, यामुळे शहरातील कलाकारांमध्ये आणि रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राज्य सरकारच्या “नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे करणे” या योजनेअंतर्गत ही मान्यता देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, बीड ही कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. नाट्यगृहाचे नूतनीकरण आधुनिक गरजांनुसार व्हावे, या दृष्टीने हा निधी खर्च केला जाणार आहे.

या शासन निर्णयानुसार, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाला प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करायची आहे. तसेच, या विकास कामासाठी जिल्हा नियोजन अधिकारी हे नियंत्रक अधिकारी म्हणून काम पाहतील, तर सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी हे आहरण व संवितरण अधिकारी असतील. या कामाचा खर्च सन २०२५-२६ च्या मंजूर अनुदानातून भागविला जाणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नाट्यगृहाच्या दुरवस्थेमुळे नूतनीकरणाची मागणी केली जात होती. आता निधी मंजूर झाल्यामुळे नाट्यगृहाचा चेहरामोहरा बदलणार असून, बीडच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडणार आहे.


Categories

Recent Posts