Breaking
Updated: डिसेंबर 18, 2025
बीड सायबर पोलिसांची तत्परता; फसवणुकीचे ८९ हजार रुपये फिर्यादीला परत
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये बीड सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे एका महिलेचे फसवणूक झालेले पैसे परत मिळवून दिले आहेत. सायबर भामट्यांनी फिर्यादीच्या मोबाइल आणि सिमकार्डचा गैरवापर करून फसवणूक केली होती. या प्रकरणातील ८९ हजार रुपये रोख रक्कम जप्त करून ती फिर्यादी महिलेस सन्मानाने परत करण्यात आली आहे.
मिनाक्षी दत्ता आंधळे (रा. हिंगणी, ता. जि. बीड) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. सायबर गुन्हेगारांनी मिनाक्षी यांच्या बँक खात्यावरून १ लाख ३३ हजार ९९५ रुपये काढून घेतले होते. याप्रकरणी सायबर पोलीस ठाणे, बीड येथे भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) आणि आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक निलेश केळे आणि सपोनि संदिप अराक यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा शोध घेतला आणि त्यांच्याकडून ८९ हजार रुपये हस्तगत केले.
जप्त केलेली ही रक्कम उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या हस्ते फिर्यादी मिनाक्षी आंधळे यांना सुपूर्द करण्यात आली. या गुन्ह्यातील मुख्य तिसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलच्या पथकाने केली. पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.