Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

बिबट्याचा प्रतिकार करताना पाळीव कुत्र्याचा मृत्यू.

Updated: डिसेंबर 1, 2025

By Vivek Sindhu

बिबट्याचा प्रतिकार करताना पाळीव कुत्र्याचा मृत्यू.

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

जीव वाचला पशुधनाचा, केदार कुटुंबावर शोककळा. वनविभागाच्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांमध्ये रोष.

शिरूर कासार: तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी सध्या भयग्रस्त झाले आहेत. सोमवारी (दि. १) पहाटे वारणी शिवारातील जुनी बीड–पांदी रस्त्यावरील डोंगरे वस्तीच्या शाळेजवळील एका शेतात बिबट्याने हल्ला केला असता, पाळीव कुत्र्याने मोठ्या हिमतीने प्रतिकार करत पशुधनाचे रक्षण केले पण यात तो स्वतः मारला गेला.

शेतकरी संतोष श्रीमंत केदार यांच्या गट क्रमांक ४६५ मधील शेतात ही दुर्दैवी घटना घडली. हल्ल्यात केदार यांचा साडेचार वर्षांचा ‘लयजा’ नावाचा श्वान बिबट्याच्या तावडीत सापडून ठार झाला. ‘लयजा’ने म्हैस, वासरे, शेळ्या, गायी आणि बैल यांसारख्या पशुधनाचा जीव वाचवण्यासाठी बिबट्याशी निकराचा संघर्ष केला.

दिवसभर शोध घेतल्यानंतर सायंकाळी चार वाजता ‘लयजा’ पूर्णपणे खाल्लेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळून आला. त्याची अंदाजे किंमत सुमारे ६० हजार रुपये इतकी होती. ‘लयजा’वर जीवापाड प्रेम करणाऱ्या केदार कुटुंबातील सदस्यांसह परिसरातील सर्वजण हा प्रकार पाहून खूप भावूक झाले असून, केदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ‘लयजा’ने कुटुंबावर किंवा पशुधनावर कोणतीही जीवितहानी होऊ दिली नाही, असे शेतकरी संतोष केदार यांनी सांगितले. त्यांनी ‘लयजा’ला औषधोपचार, देखभाल आणि प्रेमाने वाढवले होते, असेही ते म्हणाले.

दरम्यान, या घटनेनंतर शेतकऱ्यांनी वनरक्षक जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी “आज येऊ शकत नाही, उद्या पाहू,” असे सांगून फोन बंद केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. त्यामुळे वनविभागाच्या या भूमिकेबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.

शेतकरी संतोष केदार यांनी सांगितले की, ते आजच वनअधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून पंचनामा करण्याची मागणी करणार आहेत आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही सहकार्य करावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.


Categories

Recent Posts