Breaking
Updated: डिसेंबर 17, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – येथील इंडियन मेडिकल असोसिएशन, शाखा अंबाजोगाईची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणी २ वर्षे कालावधीसाठी कार्यरत राहणार आहे. यात सर्वानूमते डॉ.राहुल धाकडे (अध्यक्ष), प्रा.डॉ.विजय लाड (उपाध्यक्ष), डॉ.बळीराम मुंडे (कोषाध्यक्ष), डॉ.उध्दव शिंदे (सचिव) आणि डॉ.अतुल शिंदे व डॉ.निलेश तोष्णिवाल (सहसचिव) असणार आहेत. या कार्यकारिणीत सदस्य डॉ.नितीन पोतदार, डॉ.अनिल मस्के, डॉ.सुनिल जाधव (सांस्कृतिक उपक्रम सचिव), डॉ.शिवराज पेस्टे, डॉ.संदीप जोगदंड (क्रीडा उपक्रम सचिव), तर कार्यकारीणीत डॉ.नवनाथ घुगे (माजी अध्यक्ष), डॉ.विनोद जोशी (राज्य समन्वयक), डॉ.मनिषा पवार (महिला विभाग अध्यक्षा), डॉ.जिगिषा मरवाळे (महिला विभाग सचिव), डॉ.स्नेहल होळंबे (महिला विभाग उपाध्यक्षा), डॉ.अरूणा केंद्रे (महिला विभाग माजी अध्यक्षा) आणि निमंत्रित सदस्य म्हणून सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले (राज्य कार्यकारिणी सदस्य) यांचा समावेश आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन, शाखा अंबाजोगाईच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणीचे शहरातील आरोग्य क्षेत्रातून स्वागत होत आहे.
अध्यक्षपदी डॉ.राहुल धाकडे :
विद्यार्थी दशेपसूनच डॉ.राहुल धाकडे हे आंबेडकरी चळवळ, सम्यक विद्यार्थी आंदोलन ते एक उपासक म्हणून सामाजिक धम्म चळवळी मध्ये सक्रिय सहभाग घेऊन तन-मन-धनाने काम करणारे कार्यकर्ते आहेत. ते समाजजीवनात विविध आघाड्यांवर पुढाकार घेऊन काम करतात. मानवतावाद हा एकच धर्म असे मानून त्या मानवतेसाठी काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ.धाकडे सर्वदूर ओळखले जातात. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे ते सदस्य ही आहेत. यापूर्वी आशा आयसीयूच्या माध्यमातून त्यांनी बांधिलकी जोपासत गरजूंना दर्जेदार रूग्णसेवा दिली आहे. शिक्षक दिनानिमित्त ते अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने शिक्षक अवार्ड प्रदान करतात. ते एक ऑल रांऊडर, अभ्यासू, मनमिळाऊ, शांतसंयमी, कुशल संघटक, सामाजिक कार्यात अग्रेसर, हजारो रूग्णांना जीवनदान देणारे प्रसिद्ध छातीविकार व मधुमेह तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (ऍम्पा) या अंबाजोगाई तालुक्यातील सर्व वैद्यकीय शाखा सर्व डॉक्टरांच्या संघटनेची स्थापना केली. पहिली कार्यकारणी बिनविरोध निवडण्यात आली. अध्यक्ष म्हणून डॉ.राहुल धाकडे यांची निवड करण्यात आली. ऍम्पाचे सध्या २०० पेक्षा अधिक सक्रिय सदस्य आहेत. या माध्यमातून त्यांनी मागील ४ वर्षांपासून आयपीएलच्या धर्तीवर ‘ऍम्पा क्रिकेट कप’ स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले आहे. तसेच डाॅक्टर्स बांधवांसाठी ते सर्व सन्माननिय डाॅक्टर्स बंधू-भगिणी यांना सोबत घेऊन सांस्कृतिक, क्रीडा व असेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. या सोबतच त्यांनी अंबाजोगाईत मातोश्री रमाई आंबेडकर जयंती महोत्सवाची सुरूवात केली, तसेच बुध्दिस्ट फौंडेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून नियोजित विश्वशांती महाविहार उभारणीसाठी पुढाकार घेणारे, भव्य धम्म महोत्सवाचे आयोजन करणारे डॉ.धाकडे हे भीम जन्मभूमी, राष्ट्रीय स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, डॉ.आंबेडकर नगर (महु.), मध्यप्रदेशचे कार्यकारणी सदस्य ही आहेत. डॉ.धाकडे यांनी यापूर्वी अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषविले आहे. तसेच ते मराठवाडा साहित्य परिषद अंबाजोगाई शाखेचे सध्या अध्यक्ष आहेत. यापूर्वी ते उपाध्यक्ष ही होते. मानवलोक व मसाप शाखा अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच भावठाणा, ता.अंबाजोगाई येथे दुसरे मृदगंध ग्रामीण साहित्य संमेलन आयोजन करणे, मराठी भाषा विद्यापीठाचे उपकेंद्र अंबाजोगाई येथे व्हावे, शालेय शिक्षणात पहिल्या वर्गापासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय पुर्णतः रद्द करण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करणे, अंबाजोगाई हे पुस्तकाचे गांव म्हणून जाहीर केल्याबद्दल शासनाचे आभार मानने. यासाठीच्या पाठपुराव्यामध्ये त्यांचा ही सहभाग राहिला आहे. शहरात साहित्यिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात डॉ.धाकडे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण व सर्वंकष कामगिरीची दखल घेऊन व आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल ‘मराठवाडा हेल्थ केअर आयकॉन’ या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराने नुकताच डॉ.धाकडे यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या अनुभवाचा व सातत्यपूर्ण कार्याचा फायदा इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा, अंबाजोगाईला होणार आहे. डॉ.राहुल धाकडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या निवडीबद्दल अंबाजोगाई शहराच्या वैद्यकीय क्षेत्रातून स्वागत होत आहे.