Breaking

पोलीस पथकावर गावकऱ्यांचा हल्ला; आरोपी पळवून नेला, पोलिसाची सोन्याची चैन लुटली

Updated: सप्टेंबर 15, 2025

By Vivek Sindhu

सालगडी शेतमालकाच्या घरातून ४० हजार रुपये घेऊन फरार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : परजिल्ह्यातील आरोपीच्या शोधासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गावकऱ्यांनी हल्ला करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. झटापटीदरम्यान आरोपीस पळवून नेण्यात आले आणि पोलिसाच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चैन लुटण्यात आली. ही घटना १४ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर पोलीस ठाण्यातील सहा. फौजदार भरत कुशाबा मुठे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. १० सप्टेंबर रोजी जुन्नर पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी ते आणि त्यांचे पथक बीड जिल्ह्यात आले होते.

सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी बंडु जाणु राठोड (रा. रामनगर तांडा, काळेगाव हवेली, ता. जि. बीड) यास पकडण्यात आले असता त्याने आरडाओरड केली. त्याची पत्नी, मुलगी, मुलगा, आई यांनी धाव घेऊन पोलिसांना धक्काबुक्की केली. यानंतर गावातील १५ ते २० लोक जमा झाले. त्यापैकी जिजाबाई चंद्रकांत राठोड, रावसाहेब लालू पवार (दोघेही रा. लक्ष्मीआई तांडा, नाळवंडी, ता. जि. बीड), तसेच बनेल व अन्य दोन इसम यांनी पोलिसांना धमकावले. त्यांनी जबरदस्तीने बंडु राठोड यास पोलिसांच्या ताब्यातून सोडवून नेले.

दरम्यान, झटापटीत एका अनोळखी इसमाने फौजदार मुठे यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चैन (किंमत अंदाजे १,८०,००० रुपये) खेचून नेली. घटनेचा काही भाग फिर्यादीसह असलेल्या विवेक कैलास नवले (रा. कुरण, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे.

या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात बंडु जाणु राठोड, त्याची पत्नी, मुलगी, मुलगा, आई, जिजाबाई चंद्रकांत राठोड, रावसाहेब लालू पवार आणि इतर ८ महिला व ४ पुरुष अशा एकूण १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि गोलवाल करत आहेत.


Categories

Recent Posts