Breaking
Updated: जानेवारी 21, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelदागिने चोरांपासून सतर्क राहण्याचे बीड पोलिसांचे आवाहन
बीड: जिल्ह्यात सध्या मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांची लगबग सुरू असून, या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी बीड पोलिसांनी महत्त्वपूर्ण सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या २५ तारखेपर्यंत हे कार्यक्रम सुरू राहणार असल्याने, या संधीचा फायदा घेत दुचाकीवरून येणारे चोरटे महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि गंठण लांबवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर महिलांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना आणि कार्यक्रमाला जाताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर पडताना महिलांनी शक्यतो एकटे न जाता दोन-तीन महिलांच्या समूहाने प्रवास करावा, जेणेकरून चोरट्यांवर वचक राहील. रस्त्याने चालताना जर एखादी संशयास्पद व्यक्ती, विशेषतः डोक्यावर हेल्मेट घातलेले किंवा तोंडाला रुमाल बांधलेले दोन-तीन तरुण वारंवार दुचाकीवरून चकरा मारताना दिसल्यास त्वरित सावध व्हावे. अशा परिस्थितीत वेळ न घालवता संबंधित माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला द्यावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अनेकदा चोरटे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांना थांबवतात आणि लक्ष विचलित करून दागिने हिसकावून पळून जातात. त्यामुळे रस्त्यात अनोळखी व्यक्तीला कोणतीही माहिती देणे टाळावे आणि अशा लोकांपासून दूर राहावे. जर दुर्दैवाने दागिन्यांची चोरी झालीच, तर न घाबरता तात्काळ ११२ या क्रमांकावर किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. बीड पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असून ‘सतर्क राहा, सुरक्षित राहा’ असा संदेश या निमित्ताने देण्यात आला आहे.