Breaking
Updated: June 16, 2025
WhatsApp Group
Join Nowबीड : शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी एक आगळीवेगळी पुढाकार घेत, थेट शेतात उतरून सोयाबीनची पेरणी केली. बीड तालुक्यातील खंडाळा येथील शेतकरी बाबासाहेब चिंतामण जायभाये यांच्या शेतात त्यांनी चाड्यावर मुठ धरत पेरणी करून शेतकऱ्यांच्या श्रमाला प्रशासनाचा साथ दिल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
सध्या पावसाळा सुरू होताच शेतकरी बांधव पेरणीच्या कामात व्यस्त असून, त्यांच्या मेहनतीला शासनाची साथ मिळावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी स्वतः शेतात उतरले. त्यांच्यासोबत तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामस्थ आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत शेतीसंबंधी अडचणी, बियाणे आणि खतांचा पुरवठा, कृषी योजनांची अंमलबजावणी यावर चर्चा केली. योग्य सल्ला व सहाय्य वेळेत मिळावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या.
या सकारात्मक उपक्रमामुळे शेतकरी वर्गात नवीन ऊर्जा निर्माण झाली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष सहभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची आस्था आणि प्रत्यक्ष कृतीने दिलेला पाठिंबा ग्रामीण भागात प्रेरणादायी ठरत आहे.
यानंतर खंडाळा गावाची पाहणी करत त्यांनी महावितरणचे विद्युत पोल आणि गावातील वीज वाहिनींचीही पाहणी केली. स्थानिक अडचणी समजून घेत, त्यावर लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. “शेती हा आपल्या देशाचा कणा आहे आणि या कण्याला बळ देणं हीच आमची प्राथमिकता आहे,” असे सांगत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील नातं अधिक दृढ केलं आहे.