Breaking
Updated: सप्टेंबर 15, 2025
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजी मंत्री धनंजय मुंडे यांची मागणी; बीडमध्ये मोर्चा
बीड – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारावर बंजारा समाजाला एसटी अर्थात अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. इतर जातींना हैदराबाद गॅझेटमधील नोंदींनुसार न्याय मिळत असेल, तर आमच्या बंजारा समाजालाही एसटीचे आरक्षण देण्याचा राज्य सरकारला विचार करावा लागेल, असे ते म्हणालेत. सत्ताधारी पक्षानेच बंजारा समाजाला एसटीचे आरक्षण देण्याची मागणी केल्यामुळे या मुद्याचे मोठे राजकारण होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने नुकताच मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारावर कुणबी अर्थात ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख अनुसूचित जमातीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे बंजारा समाजानेही आपल्याला एसटीचे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी समाजाने आज बीडमध्ये मोर्चा काढला. यावेळी आयोजित सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी उपरोक्त मागणी केली. ते म्हणाले, इतर जातींना हैदराबाद गॅझेटनुसार न्याय मिळत असेल तर आमच्या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचे आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारला विचार करावा लागेल.
काहीही करा, समिती स्थापन करा. समिती निर्माण करून या मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे आरक्षण देण्यासाठी सरकारही प्रयत्न करेल हा ही मी आपल्याला विश्वास देतो. आज या बंजारा समाजाला तेलंगणात एसटी, राजस्थानात एसटी, आम्हीही तिकडे एसटीतच आहोत. बंजारा व वंजारा एकच आहे ना? असे धनंजय मुंडे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, कर्नाटक, राजस्थानसह इतर अनेक राज्यात गोरमाटी समाजाला एसटीचे आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकारही याविषयी विचार करेल. हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांसोबत आहे. हा माझा वैयक्तिक लढा आहे. माझ्यासारखा नशीबवान मीच आहे. आज मी मंत्री असतो तर मला या मोर्चाला येताच आले नसते. आज मंत्री नाही म्हणून मला इकडे येता आले. पण नशीबवान यासाठी आहे की, या महाराष्ट्रातील छोट्यातील छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा व धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आज बंजारा समाजाच्या आरक्षणात सुद्धा लढाईला मला उभे राहता येते याच्यासारखे दुसरे नशीब कोणतेच नाही.
हैदराबाद गॅझेटमध्ये अनेक समाजाला वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण आहेत. ते आरक्षण असतानाही याठिकाणी पूर्वीचे एसटी, आपण नव्याने होणारे एसटी याचा कसा मेळ घालायचा याचा अभ्यास करावा आणि लवकरात लवकर बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ. गरज पडल्यानंतर आपल्या समाजाला सांगण्याची गरज नाही. प्रत्येक मोर्चात प्रत्येक संघर्षात मी तुमच्यासोबत आहे. बीड जिल्ह्यातील वाडी, वस्ती, तांड्याच्या विकासात मी तुमच्या सोबत आहे. इथे आलेल्या अर्ध्या लोकांना मी नावानिशी ओळखू शकतो, एवढा आपला घरोबा आहे. यश मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही. सरकारला याविषयी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आपण आग्रह धरू, असेही धनंजय मुंडे म्हणाले.