Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

बालझुंबड – वैयक्तिक नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांचे बहारदार सादरीकरण

Updated: जानेवारी 8, 2026

By Vivek Sindhu

*बालझुंबड - वैयक्तिक नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांचे बहारदार सादरीकरण*

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

विद्यार्थ्यांसाठी बालझुंबड हे दर्जेदार व्यासपीठ – अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही सलग २६ व्या बालझुंबड मधील वैयक्तिक नृत्य स्पर्धा बुधवार, दिनांक ०७ व गुरूवार, दिनांक ०८ जानेवारी २०२६ रोजी सलग दोन दिवस आयोजित करण्यात आली होती. संयोजक तथा मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी व बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत मोदी यांच्या संकल्पनेतून आयोजित वैयक्तिक नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित गीतांवर आपले बहारदार सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश मुडेगावकर (ज्येष्ठ पत्रकार) हे तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक आकाश कराड, मुख्याध्यापक तथा प्राचार्य अझहर पठाण (सिनर्जी इंटरनॅशनल स्कूल, घाटनांदूर), मुख्याध्यापक तथा प्राचार्य विनायक मुंजे (जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय) आणि परिक्षक म्हणून प्रथमेश गायकवाड (लातूर), दिपक पदमपल्ले (लातूर) यांची उपस्थिती होती. पुज्य सानेगुरूजी यांच्या प्रतिमेचे पुजन, दीपप्रज्ज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मान्यवरांचा सत्कार संयोजक समितीच्या वतीने करण्यात आला. यावेळी बोलताना प्रमुख अतिथी मुख्याध्यापक अझहर पठाण म्हणाले की, मागील २५ वर्षांपासून अव्याहतपणे सुरू असलेल्या बालझुंबडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व विकास घडवून आणणे, प्रगतीसाठी हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. वैयक्तिक नृत्य स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, देहबोली, क्रियाशीलता या कौशल्यांचा विकास होतो. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश प्राप्त करावे आणि विविध क्षेत्रात करिअर करण्यासाठी ज्ञान संपादन करावे, बालझुंबड स्पर्धेच्या माध्यमातून आपला सांस्कृतिक वारसा जपला जातो. मला स्पर्धक म्हणून या स्पर्धेत सहभागी होता आले नाही. पण, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहात आले याचा मनस्वी आनंद होत आहे.‌ फक्त अभ्यास एके अभ्यास अशी सक्ती पालकांनी मुलांना करू नये तर अशा स्पर्धेत सहभागी व्हायला लावून मुलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन मुख्याध्यापक तथा प्राचार्य पठाण यांनी करून वैयक्तिक नृत्य स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरसेवक आकाश कराड यांनी बालझुंबड ही स्पर्धा सातत्याने २६ वर्षे होत आहे. मोबाईल पासून मुलांना दूर ठेवण्यासाठी बालझुंबड सारख्या स्पर्धा दिशादर्शक ठरतात. संयोजक राजकिशोर मोदी, सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी, कार्यकारी संचालक संकेत मोदी यांच्या संकल्पनेतून हा अभिनंदनीय उपक्रम सुरू असल्याचे सांगून भविष्यात बालझुंबड मधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट कलावंत, खेळाडू, चित्रकार, वैज्ञानिक निर्माण व्हावेत अशी अपेक्षा नगरसेवक कराड यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ पत्रकार अविनाश मुडेगावकर यांनी सांगितले की, मागील २५ वर्षांपासून अव्याहतपणे सुरू असलेल्या बालझुंबडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मी सतत २६ वर्षे या उपक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतो आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांचा व्यक्तीमत्व विकास व्हावा, याकरिता हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. पालकांनी यापुढेही असाच प्रतिसाद देवून बालझुंबड स्पर्धा यशस्वी करावी अशी अपेक्षा मुडेगावकर यांनी व्यक्त केली. प्रारंभी प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक तथा प्राचार्य विनायक मुंजे यांनी सांगितले की, बालझुंबड आयोजनाचे हे २६ वे वर्ष आहे. प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने संयोजक राजकिशोर मोदी, सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी सर, कार्यकारी संचालक संकेत मोदी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू आहे. बालझुंबड म्हणजे अंबाजोगाई तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे एकत्रित स्नेहसंमेलन होय. चित्रकला स्पर्धेच्या आयोजनातून यावर्षी बालझुंबडचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी स्वाराती रूग्णालयात रूग्ण आणि नातेवाईकांना दीपावली निमित्ताने फराळ वाटप, रक्तदान शिबिराचे आयोजन, विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण करण्यात येते. तसेच कोविड काळात गरजूंना मदत केली. आणि कोरोना योध्द्यांचा सन्मान केला आहे अशी माहिती मुंजे यांनी दिली. बालझुंबड २०२६ वैयक्तिक नृत्य स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार समन्वयक राजेश कांबळे यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंगेश बलुतकर, सय्यद शफीक, खरात सर, विकास शिंदे यांच्यासोबत प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

वैयक्तिक नृत्य स्पर्धेत बहारदार सादरीकरण :
विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव देत वैयक्तिक नृत्य स्पर्धेत विविध प्रकारच्या गीतांवर आधारित नृत्य सादर केले. यात मुलींचा मोठा सहभाग होता. ही स्पर्धा बुधवार आणि गुरूवार अशी सलग दोन दिवस, दोन गटात आयोजित करण्यात आली आहे. वैयक्तिक नृत्य स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाला सादरीकरणासाठी अडीच मिनिटांचा अवधी दिला होता. यात अनेक स्पर्धकांनी आकर्षक पेहराव करून आपले नृत्य आविष्कार सादर केले. बुधवारी ही स्पर्धा इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी या गटासाठी घेण्यात आली. त्यात अंबाजोगाई शहर व तालुक्यातील विविध शाळांमधील एकूण ७८ स्पर्धक संघ सहभागी झाले. तर गुरूवारी ही स्पर्धा इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी आणि इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी या गटांसाठी घेण्यात आली. त्या दोन्ही गटांत एकूण ६५ स्पर्धक संघ सहभागी झाले. बुधवारी आणि गुरूवारी दोन दिवस सुरू असलेल्या वैयक्तिक नृत्य या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.


Categories

Recent Posts