Breaking

शिरूर कासार तालुक्यात रानडुक्करांचा धुमाकूळ

Updated: मार्च 17, 2026

By Vivek Sindhu

एका रात्रीत एकरभर पिके फस्त केल्याने बळीराजा संकटात

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

एका रात्रीत एकरभर पिके फस्त केल्याने बळीराजा संकटात

शिरूर का.: तालुक्यातील शेतकरी सध्या रानडुक्करांच्या वाढत्या त्रासामुळे हवालदिल झाले असून एकाच रात्रीत तब्बल एक एकर पीक उद्ध्वस्त होण्याच्या घटनांमुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. निसर्गाच्या लहरीपणासोबतच आता या जंगली प्राण्यांच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याने शासनाने तातडीने प्रभावी आणि कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात अशी आर्त हाक बीडमधील शेतकऱ्यांनी दिली आहे. रानडुक्करांचे कळप शेतात घुसून पिकांची नासाडी करत असल्याने शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट मातीमोल होत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

शिरूर तालुक्यात रानडुक्करांच्या उच्छादामुळे हातातोडाशी आलेला घास हे जंगली प्राणी हिरावून घेत आहेत. पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी शेताभोवती तारांचे कुंपण लावणे किंवा जाळ्या बसवणे यांसारखे प्रयत्न करत आहेत मात्र ताकदवर रानडुक्कर या जाळ्या तोडून आत शिरत आहेत. काही ठिकाणी शेतकरी शेतातील तारेत वीजप्रवाह सोडण्याचा धोकादायक प्रयत्न करत आहेत परंतु यामुळे मानवी जीवितहानी होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी शेतात राखण करताना जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

राज्यात सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे आणि सभागृहात हा प्रश्न ठामपणे मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतजमिनीभोवती भक्कम संरक्षक भिंत किंवा सामूहिक कंपाऊंड उभारण्यासाठी शासनाने विशेष योजना राबवावी असा सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या या नुकसानीची दाहकता मोठी असून त्यावर तातडीने तोडगा न निघाल्यास शेती करणे कठीण होईल अशी भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान या गंभीर प्रश्नावर शिवसेना जिल्हा संघटक तसेच देवसेना जिल्हाध्यक्ष रतन गुजर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तरी आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवू असा इशाराही रतन गुजर यांनी यावेळी दिला आहे.