Breaking
Updated: June 2, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupसोनेसांगवीच्या शेतकऱ्याचे १० लाखाचे नुकसान
केज – सोनेसांगवी (ता. केज) येथील शेतकऱ्याने पावणे चार एकर क्षेत्रावर अडीच लाख रुपयांचा खर्च करून टरबूजचे पीक जोपासले. १ ते ५ किलोपर्यंत टरबूज पोसले, तोडणी करून टरबूज विक्रीच्या वेळी अवकाळी पाऊस पडत राहिला. मागील १५ ते २० दिवसापासून सतत पाऊस राहिल्याने टरबूज जाग्यावर सडले असून या शेतकऱ्याचे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सोनेसांगवी (ता. केज) येथील राजेभाऊ भाऊसाहेब कणसे यांनी पावणे चार एकर क्षेत्रावर मार्च महिन्यात ५० हजार रुपये खर्च करून टरबूज पिकाची २१ हजार रोपांची लागवड केली. ६० हजार रुपये खर्च करून वेळोवेळी खते देऊन एक लाख रुपयांची विविध प्रकारची औषध घेऊन ५ ते ६ फवारणी करून त्यांनी टरबूज पीक व्यवस्थितपणे जोपासल्याने वेलीला १ ते ५ किलो वजनाची टरबूज पोसली. मे महिन्यात टरबुजची पहिली तोडणी करून विक्री करण्याच्या वेळी अवकाळी पावसाने सुरुवात केली. त्यानंतर दररोज ढगाळ वातावरण आणि अधून मधून पाऊस पडत राहिला. त्यात १५ ते २० दिवसांपासून उघडीप न दिल्याने टरबूज वेलीपासून तुटून टरबूज जाग्यावर सडले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरात काहीच उत्पन्न पडले नसून रोपे, खते, औषधासह लागवड व फवारणीची मजुरी असा जवळपास अडीच लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. उत्पन्न हातातून गेल्याने राजेभाऊ कणसे यांचे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
चांगले उत्पन्न मिळेल म्हणून अडीच लाख रुपये खर्च करून पावणे चार एकर क्षेत्रावर टरबूज घेतले. मात्र तोडणीच्या वेळी अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. टरबूजच्या उत्पन्नातून मिळणाऱ्या पैशावर मुलाला कृषी दुकान टाकून द्यायचे होते. आता कसे दुकान टाकून द्यायचे ?
राजेभाऊ कणसे
शेतकरी राजेभाऊ कणसे यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. सततच्या अवकाळी पावसाने टरबूजची वेली पूर्णपणे नष्ट झाली असून पूर्ण टरबूज फळांचे नुकसान झाले आहे.
योगेश लामतुरे
कृषी सहाय्यक, केज.