Breaking
Updated: नोव्हेंबर 8, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : नगर पालिका निवडणुका जाहीर होताच सर्व पक्षांतर्गत तिकीट वाटपाची हालचाल वेगाने सुरू झाली आहे. यंदा स्वच्छ प्रतिमेचे, जनसंपर्क असलेले आणि समाजकारणात सक्रिय उमेदवार निवडण्याकडे सर्वच पक्षांचा कल दिसतो. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मधून पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अतुल शंकरराव जाधव हे नाव चर्चेत अग्रस्थानी आले आहे.
गुरुवार पेठ परिसरात राहत असलेले अतुल जाधव हे तरुण, तडफदार आणि संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ते मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. काकाजींचा आदेश त्यांच्या दृष्टीने अंतिम असतो, अशी त्यांची ओळख त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आहे. पत्रकारितेचे शिक्षण घेतलेले जाधव यांनी स्थानिक प्रश्नांवर सातत्याने लेखन केले असून, सामान्य नागरिकांच्या अडचणींचा आवाज त्यांनी वारंवार माध्यमांतून मांडला आहे.
जाधव यांच्या उमेदवारीची चर्चा काही दिवसांपासून समाज माध्यमांवर जोरात आहे. नव्या चेहऱ्याची आणि स्वच्छ प्रतिमेची गरज असलेल्या या प्रभागात ते एक “नवी कोरी पाटी” म्हणून उदयास येत आहेत. सामान्य कुटुंबातून आलेल्या जाधव यांनी आपले स्थान केवळ परिश्रम आणि लोकसंपर्कातून निर्माण केले आहे. त्यांचा संवादकौशल्य, व्यवहारकुशलता आणि जमिनीवरचा कार्यपद्धतीमुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक भाव निर्माण झाला आहे.
विकासकामांच्या बाबतीतही जाधव यांनी सक्रिय भूमिका निभावली आहे. शहरातील नव्याने झालेले रस्ते, नाल्या असे अनेक विकास प्रकल्प यश कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून त्यांच्या देखरेखीखाली पार पडले आहेत. त्यामुळे प्रभाग १० सह संपूर्ण अंबाजोगाई शहराची त्यांना सखोल माहिती आहे. या प्रक्रियेत त्यांनी हजारो नागरिकांशी थेट संपर्क साधला, त्यांच्या समस्या ऐकल्या आणि शक्य तेथे वैयक्तिक पातळीवर उपाययोजना केल्या.
आजही कोणतेही अधिकृत पद नसतानाही नागरिक त्यांच्याकडे अडचणी घेऊन येतात आणि जाधव त्यांचे प्रश्न योग्य माध्यमातून सोडवतात. पोलिस ठाणे, शासकीय कार्यालये किंवा नगर पालिका प्रत्येक ठिकाणी त्यांचे मजबूत संपर्क आणि ओळख आहे. त्यासोबतच काकाजींची खंबीर साथ असल्याने त्यांना लोकांची कामे करणे सहजसोपे जाते.
राजकारणात अशा तळागाळातून आलेल्या, स्वच्छ प्रतिमेच्या, सुसंवादक्षम तरुणांना संधी मिळाल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, असा मतदारांचा विश्वास आहे. जाधव यांचा दृष्टिकोन पक्षीय पेक्षा लोकाभिमुख आहे. प्रभागातील स्थानिक विकास, रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा यावर प्राधान्याने काम करण्याचा मानस अतुल जाधव यांनी व्यक्त केला आहे.
अतुल जाधव यांची उमेदवारी जर अंतिम झाली, तर ती या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० साठी ‘गेमचेंजर’ ठरू शकते. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचे, काकाजींच्या पाठबळाचे आणि नागरिकांशी असलेल्या थेट नात्याचे समीकरण लक्षात घेतल्यास या प्रभागात त्यांची उमेदवारी ही फक्त राजकीयच नव्हे तर जनभावनेची लढत ठरेल, असे स्थानिक पातळीवर दिसून येते.