Breaking

कर्ज नाकारल्याने ‘बुलढाणा अर्बन’ला बदनाम करण्याचा प्रयत्न; रात्रभर शाखा सुरू ठेवून संस्थेने दिले चोख प्रत्युत्तर

Updated: जानेवारी 3, 2026

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2026 01 03 at 3.53.48 PM

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: कर्ज नाकारल्याचा राग मनात धरून कर्नाटक येथील एका साखर कारखानदाराने ‘बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’विरुद्ध पसरवलेला अफवांचा डाव फसला आहे. संस्थेची बदनामी करण्यासाठी ‘तारण सोने विकले जाणार’ अशी खोटी माहिती पसरवण्यात आली होती. मात्र, या आव्हानाला उत्तर देण्यासाठी मराठवाड्यातील ८ ते १० शाखा रात्रभर सुरू ठेवून, ज्या सभासदांनी मागणी केली त्यांना त्यांचे सोने व पैसे तात्काळ परत करत संस्थेने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील एका साखर कारखानदाराने आधीच मोठे कर्ज घेतले असताना दुसऱ्यांदा पुन्हा कर्जाची मागणी केली होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव हे कर्ज नाकारले गेल्याचा राग मनात धरून या कारखानदाराने संस्थेची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र रचले. याकामी त्याने संस्थेतील काही कामावरून काढून टाकलेल्या निलंबित कर्मचाऱ्यांना सोबत घेतले. मराठवाड्यातील ग्रामीण भागात ‘बुलढाणा अर्बन सोने विकणार आहे’ अशा अफवा वाऱ्यासारख्या पसरवण्यात आल्या. यामुळे काही काळ सभासदांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि सोने सोडवण्यासाठी नागरिकांनी शाखांवर गर्दी केली.

ऊसतोड कामगारांच्या माध्यमातून चुकीचे संदेश पोहोचवून गरिबांच्या श्रमाच्या पैशांवर घाला घालण्याचा प्रयत्न या कारखानदाराने केला. मात्र, बुलढाणा अर्बन व्यवस्थापनाने अत्यंत संयमी आणि परखड भूमिका घेतली. नागरिकांचा गोंधळ उडू नये आणि प्रत्येकाला खात्री पटावी यासाठी मराठवाड्यातील ८ ते १० शाखा रात्रभर सुरू ठेवण्यात आल्या. मध्यरात्री ३ वाजेपर्यंत कर्मचारी कार्यरत होते आणि ज्यांनी मागणी केली, त्यांना त्यांचे तारण ठेवलेले सोने तात्काळ परत करण्यात आले. संस्थेच्या या पारदर्शक कारभारामुळे अफवा पसरवणाऱ्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला असल्याची चर्चा आहे.

बुलढाणा अर्बनची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम असून ही आशिया खंडातील सर्वात मोठी नागरी पतसंस्था मानली जाते. संस्थेकडे १५ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून ५ हजार कोटींचे सोने तारण कर्ज आहे. सध्या संस्थेकडे ४ हजार कोटींचे बॅलन्स शिल्लक असून ३७३ गोदामे आणि ४७६ शाखांचे मोठे जाळे आहे. शासनाने किंवा कोणत्याही यंत्रणेने संस्थेवर कसलेही निर्बंध लादलेले नाहीत, सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत अशी माहिती संस्थेकडून देण्यात आली. मुळात खाजगी सावकारी मोडीत काढून ग्रामीण भागातील सामान्य माणसाला सन्मानाने जगण्याचे बळ देणाऱ्या या संस्थेच्या पाठीशी आता जनता खंबीरपणे उभी राहिली असल्याचे चित्र आहे. 


Categories

Recent Posts