बीड : जिल्ह्यातील उद्योजकांच्या मागण्यांची तातडीने दखल घेत पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील उद्योगांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी आता आठवड्यातील प्रत्येक बुधवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) प्रादेशिक अधिकारी बीडमध्ये उपस्थित राहणार आहेत.
सध्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मराठवाडा विभागाचे प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे असून उप प्रादेशिक कार्यालये जालना, नांदेड, लातूर आणि परभणी येथे आहेत. बीडसाठी स्वतंत्र उप प्रादेशिक कार्यालयाची गरज असल्याने त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ना. मुंडे यांनी स्पष्ट केले. तोपर्यंत जिल्ह्यातील उद्योगांना सोयीसाठी जालन्याचे उप प्रादेशिक अधिकारी दर बुधवारी बीडच्या जिल्हा उद्योग केंद्र, संचेती बिल्डिंग, गुडलक हॉटेलजवळ, एमएसईबी ऑफिस समोर उपलब्ध राहतील.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांच्या अडी-अडचणी आणि समस्यांवर चर्चा करण्यासाठी व त्यांचे निवारण करण्यासाठी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी, छत्रपती संभाजीनगर हेही दर बुधवारी बीड येथील महामंडळाच्या उपअभियंता कार्यालयात उपस्थित राहतील, असे अधिकृतरीत्या कळविण्यात आले आहे.
या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील उद्योजकांच्या मागण्यांचे निवारण गतीने होईल आणि उद्योग क्षेत्रातील कामकाजाला चालना मिळणार आहे.