Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींचा कला व क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

Updated: जानेवारी 30, 2026

By Vivek Sindhu

पाच दिवसीय महोत्सवात विविध स्पर्धा अन् सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाच दिवसीय महोत्सवात विविध स्पर्धा अन् सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

अंबाजोगाई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात २२ ते २६ जानेवारी या कालावधीत सांस्कृतिक कला व क्रीडा महोत्सवाचे दिमाखात आयोजन करण्यात आले होते. या पाच दिवसीय महोत्सवात मुलींचे शासकीय वसतिगृह अंबाजोगाई, मुलींचे शासकीय वसतिगृह धारूर आणि संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलींचे शासकीय वसतिगृह अंबाजोगाई अशा एकूण तीन वसतिगृहांच्या विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. या सर्व उपक्रमाचे नेटके नियोजन अंबाजोगाई मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल समृद्धी सुरेश भवरे यांनी केले होते.

img 20260130 wa00165984588122427334512

या महोत्सवाचा प्रारंभ २२ जानेवारी रोजी विद्यार्थिनींच्या आरोग्य तपासणीने झाला. एकदंत डेंटल क्लिनिकचे डॉ. दीपक नागरगोजे, डॉ. प्रिया तिडके-नागरगोजे आणि डॉ. दीपाली गिराम यांनी विद्यार्थिनींची मौखिक आरोग्य तपासणी केली. यावेळी प्रिया तिडके-नागरगोजे यांनी दंत आरोग्याचे महत्त्व, दातांची निगा आणि मुखरोगांपासून बचावासाठीच्या चांगल्या सवयींबाबत विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी, २३ जानेवारी रोजी विविध क्रीडा व मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थिनींसह कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत खेळाचा आनंद लुटला.

महोत्सवाचा तिसरा दिवस वार्षिक स्नेहसंमेलन आणि निरोप समारंभाने गाजला. २४ जानेवारी रोजी तिन्ही वसतिगृहांचा संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन व १० वी, १२ वी आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माऊली डायग्नॉस्टिक सेंटरचे डॉ. विजय नाळपे, डॉ. सुप्रिया विजय नाळपे आणि एस. के. हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. जुबेर शेख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. यामध्ये विद्यार्थिनींनी विविध नृत्यकला, एकांकिका आणि नाटकांच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचे प्रभावी दर्शन घडवले.

img 20260130 wa00172305603624007228319

२५ जानेवारी रोजी सकाळी विद्यार्थिनींच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी योगा व झुंबा डान्सचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, गृहपाल समृद्धी भवरे यांनी स्वतः विद्यार्थिनींना झुंबाचे धडे दिले. त्यानंतर झालेल्या मनोगत सत्रात विद्यार्थिनींनी वसतिगृहातील आपले कडू-गोड अनुभव आणि आठवणींना उजाळा दिला. महोत्सवाच्या अंतिम दिवशी, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गृहपाल भवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते व भाषणे सादर केली.

कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी गेल्या पाच दिवसांत विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा आणि कर्मचाऱ्यांचा बक्षिसे व प्रशस्तीपत्रके देऊन गौरव करण्यात आला. दुपारी सर्व विद्यार्थिनींना मिष्टान्नाचे स्नेहभोजन देण्यात आले. विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग आणि कर्मचाऱ्यांची मेहनत यामुळेच हा महोत्सव यशस्वी झाल्याची भावना गृहपाल समृद्धी भवरे यांनी व्यक्त केली.


Categories

Recent Posts