Breaking
WhatsApp Group
Join Nowअंबाजोगाई – विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून समाजाचे एक जबाबदार घटक बनावे, तसेच कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी केले.
अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी नूतन विद्यालयात विविध पातळीवर खेळलेल्या विजेत्या विद्यार्थी खेळाडूंच्या आयोजित सत्कार समारंभात त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गणपत व्यास गुरुजी होते.मुख्याध्यापक अपर्णा पाठक , उपमुख्याध्यापक व्ही.के.गायकवाड, पर्यवेक्षक आर. एस .मठपती यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
श्रीमती तिडके व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा व क्रिडा शिक्षक बापुराव गोविंदवाड , खुशाल परदेशी यांचा गौरव करण्यात आला.
अपर पोलीस अधिक्षक चेतना तिडके यांनी आपल्या भाषणात, आजच्या तरुणाईमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, व्यसने केवळ व्यक्तीचेच नव्हे, तर कुटुंब आणि समाजाचेही मोठे नुकसान करतात.
चांगले शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्य घडवावे आणि त्यासोबतच सामाजिक मूल्यांची जपणूक करावी असे ते म्हणाल्या.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारी , सोशल मिडीया , वाहतूक नियम , गुन्हेगारी , मुलींची छेडछाड आणि इतर समाजविघातक कृत्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, कायद्याचे पालन करून एक सुजाण नागरिक म्हणून जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग करून विधायक कामांमध्ये लक्ष घालावे आणि समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असेही तिडके यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला, शाळा प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. अपर पोलीस अधिक्षक तिडके यांच्या आवाहनाने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यास मदत झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष गणपत व्यास यांनी अध्यक्षीय समारोप केला.भागवत मसने यांनी सुत्रसंचालन करुन आभार व्यक्त केले.
Last Updated: July 5, 2025