Breaking
Updated: डिसेंबर 24, 2025
मृत्यूनंतरही सेवेचा वसा: आनंदग्रामच्या संध्याताई बारगजे यांच्या वडिलांचे 'स्वाराती'त देहदान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: गेल्या अनेक वर्षांपासून एचआयव्ही बाधित मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘आनंदग्राम’च्या माध्यमातून सामाजिक कार्याचा डोंगर उभा करणारे दत्ता बारगजे यांचे सासरे तथा संध्या बारगजे यांचे वडील गणपत यशवंतराव चाटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आपल्या मृत्यूनंतर आपला देह वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी कामी यावा, ही त्यांची अंतिम इच्छा होती. त्यांच्या या इच्छेचा मान राखत आज सायंकाळी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे देहदान करण्यात आले.
गणपत यशवंतराव चाटे गेल्या अनेक वर्षांपासून आनंदग्राम परिवाराशी जोडले गेले होते. वृद्धापकाळातील आजारपणामुळे त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालय आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी, त्यांनी स्वतः व्यक्त केलेल्या इच्छेनुसार देहदानाचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला.
आज सायंकाळी ५:३० वाजता आनंदग्राम येथून गणपतराव चाटे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ही यात्रा स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य कमानीपाशी पोहोचल्यानंतर दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे यांनी हातात पुष्पचक्र घेऊन ‘देहदान सर्वश्रेष्ठ दान’ आणि ‘भारत जोडो’ अशा घोषणा देत अधिष्ठाता कार्यालयापर्यंत पार्थिव आणले. यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर हेलावून गेला होता.
याप्रसंगी दत्ता बारगजे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, गणपतराव यांनी नेहमीच समाजहिताचा विचार केला. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मानवी शरीराचा अभ्यास करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या या निर्णयामुळे वैद्यकीय संशोधनाला आणि शिक्षणाला मोठी मदत होणार आहे.
देहदान प्रक्रियेवेळी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. मुकुंद मोगरीकर, डॉ. कावळे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून गणपतराव यांना श्रद्धांजली वाहिली. यामध्ये आमदार नमिता मुंदडा यांच्या वतीने नगरसेवक महादेव आदमाने, आनंदयात्री संस्थेचे अमृत महाजन, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हेमंत धानोरकर, रोटरी क्लबचे संतोष मोहिते आणि डॉ. शंकर धपाटे यांचा समावेश होता.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, पत्रकार गौतम बचुटे, बीड येथील आनंदयात्री तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. गणपत यशवंतराव चाटे यांनी मृत्यूनंतरही समाजासाठी दिलेले हे योगदान जिल्हाभरात चर्चेचा आणि आदराचा विषय ठरले आहे.