Breaking
Updated: फेब्रुवारी 18, 2026
'चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशन'चा उपक्रम
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशन’चा उपक्रम
छत्रपती संभाजीनगर: विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक विकास न करता त्यांना भावनिकदृष्ट्या सक्षम आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी ‘चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशन’च्या एज्युकेशन विंगद्वारे आयोजित ‘नर्चरिंग माईंड्स: ट्रान्सफॉर्मिंग फ्युचर्स’ हे मराठवाडा स्तरीय शिक्षण संमेलन १४ फेब्रुवारी २०२६ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाले. स्थानिक चेतना हॅपी व्हिलेजमध्ये पार पडलेल्या या संमेलनात मराठवाड्यातील १५० पेक्षा अधिक शिक्षक आणि प्राचार्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. शिक्षण पद्धतीत केवळ गुणांना महत्त्व न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या बदलांवर या परिषदेत सखोल चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महाराष्ट्र डेंटल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, विवेक रांदड, मुरली गुंगे पाटील आणि ॲड. सुभाष मालानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, सध्याच्या माहितीच्या युगात केवळ माहिती गोळा करणे पुरेसे नसून, त्याचे रूपांतर अंतर्ज्ञानात होणे काळाची गरज आहे. शिक्षण क्षेत्रातील बदलांचा स्वीकार करताना गुणांकडून कौशल्याकडे (Marks to Mastery) वळणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
मुंबई येथील डॉ. विजयम रवी आणि हैदराबादचे धीरज चंद्रा यांच्यासह डॉ. नीती सोनी, डॉ. उल्हास शिवुरकर, डॉ. सोनाली देशपांडे, मिताली रांदड लाठी आणि गायत्री रांदड यांनी विविध सत्रांमध्ये शिक्षकांना मार्गदर्शन केले. या सत्रांमध्ये ‘माईंडफुलनेस मेडिटेशन’ आणि ‘भावनिक लवचिकता’ (Emotional Resilience) यांसारख्या विषयांवर विशेष भर देण्यात आला. भविष्यातील पिढीला आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम बनवणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता. चेतना फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले असून, मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रासाठी हे संमेलन मैलाचा दगड ठरणार आहे.