Breaking

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार २०२६

Updated: एप्रिल 2, 2026

By Vivek Sindhu

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार २०२६

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील व साहित्यिक प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांना घोषित

अंबाजोगाईच्या साधना सेवाभावी संस्थेचा उपक्रम

अंबाजोगाई – थोर समाजसेवक बाबा आमटे आणि त्यांच्या कार्याला खंबीर साथ देणाऱ्या साधनाताई आमटे यांच्या स्मृती जतन करण्यासाठी येथील साधना सेवाभावी संस्थेच्या वतीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. साधनाताई आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे (१९२६–२०२६) औचित्य साधून २०२६ पासून ‘साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार’ एका दांपत्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे सचिव दगडू लोमटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या वर्षीचा पहिला पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ कवयित्री व लेखिका अनुराधा पाटील व ज्येष्ठ लेखक व मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील या दांपत्याला घोषित केला आहे.

बाबा व साधनाताई यांनी कुष्ठरोगी, अंध, अपंग, मूकबधिर, आदिवासी यांच्यासाठी महारोगी सेवा समिती स्थापन करून आरोग्य, शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन, रोजगार उपलब्ध करून उत्तम व सन्मानाने, स्वाभिमानाने जगता यावे यासाठी आपले आयुष्य खर्च केले. यासाठी समाज व शासन यांनी उत्तम सहकार्य केले. त्यातून वरोरा येथे आनंदवन, भामरागड येथे लोक बिरादरी प्रकल्प व नंतर अन्य प्रकल्प सुरू केले. या कार्यात त्यांना साहित्य, संगीत, नाटक– चित्रपट कला व ललितकला क्षेत्रातील अनेकांनी आर्थिक, मानसिक बळ दिले. तिथल्या सर्व कुष्ठरोगी, पीडित नागरिक, युवक यांचे जीवनमान उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अनेक साहित्यिकांनी आनंदवनला भेट देऊन पुस्तके लिहिली, कलावंतांनी व संगीत गायक– वादक यांनी आपली कला तिथे पेश केली. ललित क्षेत्रातील मान्यवरांनी आनंदवनात येवून अनेक उपक्रम व कार्यशाळा राबवल्या. बाबा–ताई व आनंदवन, हेमलकसा येथील कार्यावर अनेकांनी पुस्तके लिहिली. स्वतः बाबा उत्तम कवी, चित्रपट समीक्षक होते. त्याच्या व पुढच्या पिढीने केलेल्या कार्यावर, लघुपट व चित्रपट काढण्यात आले. आनंदवनात या वंचित लोकांची कला सादर करण्यासाठी ’स्वरानंदवन’ संगीतमंच निर्माण केला. साधनाताईचे ’समिधा’, बाबांचे ’ज्वाला आणि फुले’ व इतर पुस्तके, डॉ.प्रकाश आमटे यांचे ’प्रकाश वाटा’, डॉ. विकास आमटे यांचे :आनंदवन प्रयोगवन’ असे इतर साहित्य प्रकाशित आहे. ही बाजू उजागर करण्यासाठी साहित्य, कला, संगीत व ललितकला या क्षेत्रातील एकाच क्षेत्रात अथवा यातील भिन्न क्षेत्रात कार्य करणाऱ्या एका दांपत्यास हा पुरस्कार देण्याचा निर्णय साधना सेवाभावी संस्थेच्या वतीने एकमुखाने घेण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र पुष्पहार व एक लक्ष रुपये असे आहे. पहिला पुरस्कार साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय लेखन व साहित्य क्षेत्रात प्रचार व प्रसार करण्यासाठी आपले योगदान देणाऱ्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ कवयित्री व लेखिका अनुराधाताई पाटील व प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या विशेष बैठकीस संस्थेच्या अध्यक्ष डॉ. शुभदा लोहिया, सचिव दगडू लोमटे, कोषाध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष डॉ. कमलाकर कांबळे, सहसचिव प्रा. शैलेश जाधव, सदस्य अमर हबीब, प्रा. भगवान शिंदे, प्रा. डॉ. संपदा कुलकर्णी, शशिकला घोडके, अविनाश मुडेगावकर, संतोष मोहिते, स्वीकृत सदस्य बालाजी सुतार, प्रा. डॉ. शैलजा बरूरे व गोरख शेंद्रे हे सर्व सदस्य उपस्थित होते.

’अनुराधाताई पाटील’
अनुराधाताई पाटील यांनी ’दिगंत’, ’तरीही’, ’दिवसेंदिवस’, ’वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’, ’कदाचित अजूनही’, ’आता वह्या सगळ्या बुडीत खाती’ हे कवितासंग्रह, ’नवसाला पावली डॉक्टरीण’ हा प्रौढ साक्षरांसाठी दीर्घ कथासंग्रह, व ’दरअसल’, ’अनुराधा पाटील री टाळावीं मराठी कवितावां’ राजस्थानी व ’हत्या केवल शब्द नही हैं’ हे हिंदी अनुवादित कविता संग्रह प्रकाशित आहेत. त्याच बरोबर उडिया कविता, हिंदी कथा व कवितांची मराठीतील भाषांतरे प्रकाशित आहेत. त्यांच्या कवितांचे हिंदी, उर्दू, उडिया, पंजाबी, राजस्थानी, मल्याळम, बंगाली, जपानी, इंग्रजी या भाषेतील नियतकालिकेतून त्यांचे साहित्य अनुवादित होऊन प्रकाशित झाले आहे. त्यांच्या साहित्य कार्याला साहित्य अकादमी, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील मान्यताप्राप्त साहित्य संस्थांचे मानाचे २५ हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार निवड समितीच्या तज्ज्ञ परीक्षक, जैन फौउंडेशन पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्ष, राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय (विविधभाषा) कवी संमेलन, चर्चा सत्रे, प्रतिष्ठेच्या केरळ साहित्य महोत्सव, जयपूर साहित्य महोत्सव, मुंबई साहित्य महोत्सवात मराठी भाषेच्या कवी म्हणून निवड झाली होती. विविध भाषिक संमेलनाच्या उद्घाटक, अनेक संमेलनात व आकाशवाणी दूरदर्शनवर मुलाखती झाल्या. शालेय अभ्यासक्रमात व अनेक विद्यापीठात मराठी अभ्यासक्रमात त्यांची अनेक पुस्तके लागलेली आहेत. त्यांच्या साहित्यावर तीन जणांनी पी. एचडी व तीन जणांनी एम. फील केले आहे. त्यांच्या साहित्यावर विद्यापीठात एक दिवसाचे चर्चा सत्र आयोजित केले गेले. मराठीतील प्रख्यात साहित्यिकांनी त्यांच्या साहित्याचे समीक्षण केले आहे. मराठवाडा साहित्य परिषद, , प्रतिष्ठान मासिकाचे संपादक मंडळ, साहित्य अकादमी महाराष्ट्र, राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, भारतीय भाषा परिषद कलकत्ता या संस्थांचे त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे. महत्वाचे साहित्य अकादमी दिल्ली येथे पाच वर्षे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले आहे.

’प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील’
कौतिकराव ठाले पाटील हे उत्तम प्रशासक, लेखक, संघटक, शिक्षणतज्ज्ञ म्हणून सुपरिचित आहेत. त्यांची ’संमेलनाच्या मांडवाखालून’, ’मराठी भाषिक आणि साहित्य– संकृती’, हे ग्रंथ व ’वाचनवेध’, ’शेतकऱ्याचा आसूड’, व प्रतिष्ठानच्या अनेक विशेषांकाचे संपादन केले आहे. महात्मा गांधी मिशन, संभाजीनगर, व परळी, माहूर, येथील साहित्य सेवा पुरस्कारा बरोबरच महाराष्ट्र शासनाचा मंगेश पाडगावकर ’भाषा संवर्धन पुरस्कार’ प्राप्त आहे.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे दोन वर्षा पेक्षा जास्त काळ प्रशासक म्हणून कार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, भाषा मंडळाचे अध्यक्ष व कला शाखेचे अधिष्ठाता म्हणून कार्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कांहीं काळ हंगामी कुलगुरू म्हणून कार्यरत होते. मराठी भाषेच्या अध्यापनापासून सुरू झालेली मराठी साहित्याची सेवा ते आजही करीत आहेत.
मराठवाडा साहित्य परिषदेचे कांहीं काळ सचिव व २६ वर्षा पेक्षा अधिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले व करीत आहेत. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ते तीन वर्षे सचिव व दोन वेळा ६ वर्ष अध्यक्ष म्हणून त्याची कारकिर्द गाजवली आहे. नॅशनल बुक ट्रस्ट दिल्लीचे भाषा सल्लागार व साहित्य अकादमी दिल्लीचे व महाराष्ट्र शासन साहित्य पुरस्कार समितीचे पाच वर्षे सदस्य म्हणून काम केले. राष्ट्रीय भाषा चर्चा सत्रातील त्यांचा सहभाग, कार्यशाळेतील त्यांची भाषणे दिशादर्शक ठरली आहेत. २००४ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे पारपडलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते. हे संमेलन सर्वार्थाने मराठी साहित्यातील मूल्य संस्कृतीची श्रीमंती दर्शविणारे ठरले होते. विश्व मराठी साहित्य संमेलनाची कल्पना प्रथम त्यांनी मांडली. प्रचंड टीका व विरोधाला न डगमगता त्यांनी अमेरिका व दुबई येथे ही संमेलने घेतली. मराठवाडा साहित्य परिषदेचा विस्तार व प्रादेशिक संमेलने घेऊन महत्वपूर्ण कार्य केले आहे.

या दोघांच्या साहित्य कार्याचा महत्त्वपूर्ण सहभाग व महत्व पाहता अनुराधाताई पाटील व कौतुकराव ठाले पाटील यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
या पुरस्कार निवडीसाठी अमर हबीब, डॉ. शैलजा बरुरे व बालाजी सुतार यांची निवड समिती नेमली होती. त्यात दगडू लोमटे व डॉ. शुभदा लोहिया यांनी संस्थेचे सदस्य म्हणून काम केले. दगडू लोमटे हे गेली ४० वर्षे आनंदवनाशी जोडलेले आहेत. त्यांनी बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभियान १९८५–८६ साली कन्याकुमारी ते काश्मीर सायकल यात्रा केली होती. बाबा आमटे यांची जन्मशताब्दी अंबाजोगाईत साजरी केली होती. त्यांनी बाबा व साधनाताई यांच्या प्रेरणेने सामाजिक, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत. दगडू लोमटे यांच्या कल्पनेतून हा पुरस्कार सुरू करावा असा प्रस्ताव मांडला. संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी तो मान्य केला. या पुरस्काराचा वितरण समारंभ, ठिकाण व तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. अशीही माहिती त्यांनी दिली आहे.


Categories

Recent Posts