Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईत उसाला आले तुरे; उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती, बळीराजा चिंतेत

Updated: डिसेंबर 25, 2025

By Vivek Sindhu

अंबाजोगाईत उसाला आले तुरे; उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती, बळीराजा चिंतेत

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: अंबाजोगाई तालुक्यातील ‘ग्रीन बेल्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऊस उत्पादक पट्ट्यात अचानक उसाला तुरे आल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. हवामानातील बदलांमुळे उसाच्या उत्पादनात १५ ते ३० टक्क्यांपर्यंत मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून, साखर कारखान्यांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित ऊसतोड सुरू करावी, अशी आग्रही मागणी परिसरातून होत आहे.

तालुक्यातील आपेगाव, इस्थळ, धानोरा, अंजनपूर, कोपरा, ममदापूर आणि पाटोदा या परिसरातील शेती प्रामुख्याने मांजरा कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. या भागात ऊस हे मुख्य नगदी पीक असून शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित याच पिकावर आधारित आहे. मात्र, सध्या उसाला मोठ्या प्रमाणात तुरे लागल्याने ऊस वाढणे थांबले असून त्याचे वजन झपाट्याने घटत आहे. परिणामी, वर्षभराची मेहनत मातीमोल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हवामानातील सततचा लहरीपणा, कधी अचानक वाढणारा उकाडा तर कधी वाढलेली आर्द्रता यामुळे उसाला हे तुरे आले आहेत. कृषी तज्ज्ञांच्या मते, उसाला तुरे लागल्यानंतर कांड्या आतून पोकळ होऊ लागतात, पानांना छिद्रे पडतात आणि नवीन वाढ पूर्णपणे खुंटते. यामुळे उसाचे वजन १५ ते ३० टक्क्यांनी घटते आणि पर्यायाने साखर उताऱ्यावरही याचा विपरीत परिणाम होतो.

सध्या परिसरात गंगा माऊली, राजणी, अंबा साखर यांसह इतर कारखान्यांच्या ऊसतोड टोळ्या कार्यरत आहेत. मात्र, तुरा आलेला ऊस शेतात जितका जास्त दिवस उभा राहील, तितके त्याचे वजन कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान वाढणार आहे. त्यामुळे कारखान्यांनी विलंब न लावता प्राधान्याने या उसाची उचल करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

याबाबत आपली व्यथा मांडताना देवळा येथील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शेतकरी रवींद्र देवरवाडे म्हणाले की, परिसरात उसाला मोठ्या प्रमाणात तुरे लागले असून ऊस आतून पोकळ होऊ लागला आहे. कारखान्यांनी तातडीने ऊस नेला नाही तर शेतकऱ्यांचे वजन घटून प्रचंड आर्थिक नुकसान होईल.


Categories

Recent Posts