Breaking
Updated: डिसेंबर 20, 2025
तापमानाचा पारा १२ अंशांपर्यंत खाली, हुडहुडी आणखी वाढण्याची शक्यता
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला असून संपूर्ण तालुका गारठला आहे. डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात तापमानात मोठी घट झाल्याने नागरिकांना हुडहुडी भरली असून जनजीवनावर याचा परिणाम जाणवू लागला आहे. आज अंबाजोगाईचे किमान तापमान १२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून हवेतील गारवा कमालीचा वाढला आहे.
शहरात पहाटेपासूनच धुक्याची चादर पाहायला मिळत असून सकाळी उशिरापर्यंत थंडीचा प्रभाव कायम राहत आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक उबदार कपड्यांचा आधार घेत आहेत, तर ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या आरोग्यावर या बदलत्या हवामानाचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची दाट शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे थंडीची ही लाट अधिक तीव्र होणार असून नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील काही दिवस अंबाजोगाईकरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे.