Breaking

अंबाजोगाईत राष्ट्रवादीला मोठा धक्का; महादेव आदमाने आणि सुदर्शन काळे भाजपमध्ये, नंदकिशोर मुंदडा यांचे बळ वाढले

Updated: नोव्हेंबर 15, 2025

By Vivek Sindhu

अंबाजोगाईत राष्ट्रवादीला मोठा धक्का

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर अंबाजोगाईतील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक महादेव आदमाने यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश जाहीर केला आहे. तर शहरातील ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक सुदर्शन अप्पा काळे यांनीही आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये दाखल होत नंदकिशोर मुंदडा यांच्या बाजूने ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन महत्त्वपूर्ण प्रवेशामुळे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत नंदकिशोर मुंदडा यांचे पारडे अधिक जड झाले आहे.

महादेव आदमाने यांनी आई निवास येथे झालेल्या प्रवेश सोहळ्यात पक्षाची विचारधारा, विकासाभिमुख दृष्टी आणि अंबाजोगाईतील बदललेले राजकीय वातावरण लक्षात घेऊन भाजपमध्ये येत असल्याचे सांगितले. त्यांनी नमिता मुंदडा यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत शहरातील गोरगरिबांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळवून दिल्याचा उल्लेख केला. पुढे ते म्हणाले की, मुंदडा कुटुंबाने शहराच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे ते प्रभावित झाले असून नंदकिशोर मुंदडा यांना नगराध्यक्ष करण्यासाठी संपूर्ण निष्ठेने काम करणार आहेत. या सोहळ्यात अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपचा झेंडा हाती घेतला आणि अंबाजोगाईमध्ये भाजपचा विजय निश्चित करण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक सुदर्शन अप्पा काळे यांनीही भाजप प्रवेश करून शहराच्या राजकीय वातावरणात नवा बदल घडवला आहे. आ. नमिता मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांनी त्यांचे स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. काळे यांनी अंबाजोगाईत झालेल्या सर्वांगीण विकासाचे कौतुक करत शहरातील सिमेंट कॉंक्रीट रस्ते, प्रगतिपथावर असलेली २०६ कोटींची पाणीपुरवठा योजना आणि नागरिकांसाठी सुरू असलेल्या उपयोजनांचा उल्लेख केला. शहराला आधुनिक करण्यासाठी मुंदडा कुटुंबाचे नेतृत्व आवश्यक असल्याचे सांगत नंदकिशोर मुंदडा यांना नगराध्यक्ष करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एकापाठोपाठ एक दोन ज्येष्ठ नेते, त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे नंदकिशोर मुंदडा यांच्या उमेदवारीला नव्या उर्जेची भर पडली आहे. स्थानिक राजकीय वर्तुळात या प्रवेशांना मोठे महत्त्व दिले जात असून येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे गणित अधिक मजबूत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


Categories

Recent Posts