Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईत एड्स जनजागृती; विवाहपूर्व एचआयव्ही चाचणी काळाची गरज

Updated: डिसेंबर 11, 2025

By Vivek Sindhu

अंबाजोगाईत एड्स जनजागृती; विवाहपूर्व एचआयव्ही चाचणी काळाची गरज

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: जागतिक एड्स दिनानिमित्त राबवण्यात येत असलेल्या पंधरवड्याचे औचित्य साधून, येथील टी. बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयात मंगळवारी (दि. १०) विद्यार्थ्यांसाठी विशेष आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष बीड आणि स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात, ‘अडथळ्यांवर मात करू, एकजुटीने एचआयव्ही/एड्सला लढा देऊ’ या संकल्पनेवर आधारित मार्गदर्शन करण्यात आले.
सध्या जिल्हाभरात एड्स नियंत्रण पंधरवडा साजरा केला जात असून त्याअंतर्गत विविध ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. गिरवलकर महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना एचआयव्ही आणि एड्समधील फरक, संसर्गाची कारणे, लक्षणे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. समाजात या आजाराबद्दल असलेल्या समज-गैरसमजांचे निरसन करण्यात आले. तसेच एचआयव्ही कायदा २०१७, रुग्णांची गोपनीयता, मोफत तपासणी सुविधा आणि शासकीय स्तरावर उपलब्ध असलेल्या उपचार पद्धतींविषयी उपस्थितांना अवगत करण्यात आले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. अनुराधा शेंडगे यांनी एआरटी (ART), गुप्तरोग (STI) आणि क्षयरोग (TB) या विषयांवर सखोल माहिती दिली. मोफत एसटीआय सुरक्षा क्लिनिक आणि आरोग्याची काळजी घेण्याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आयसीटीसीचे समुपदेशक धनराज पवार यांनी एचआयव्ही संसर्गाची शास्त्रीय माहिती दिली. बदलत्या काळात युवकांनी सजग राहणे आवश्यक असून, सुदृढ समाजासाठी विवाहपूर्व एचआयव्ही तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. तसेच १०९७ या टोल फ्री क्रमांकाची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य राहभावले, प्राध्यापक बिराजदार, राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना एड्सविषयी माहिती देणाऱ्या पत्रकांचे (IEC) वाटप करण्यात आले.


Categories

Recent Posts